सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रयोग आणि चॅलेंजेस व्हायरल होत असतात. पण, अलीकडेच एका शाळेच्या वर्गातील अनोखा विज्ञानप्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा प्रयोग इतका सोपा वाटतो, तरी त्यामागचं विज्ञान आणि विचारशक्ती पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. “ब्रेन-टीझिंग क्लासरूम चॅलेंज” म्हणून ओळखला जाणारा हा प्रयोग आता लाखो लोकांनी पाहिला असून, त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडीओ एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेल्या चॅलेंजवर आधारित आहे. शिक्षकाने वर्गात एक ग्लास पाण्याने पूर्ण भरला आणि त्यात एक संत्र ठेवलं. मग विद्यार्थ्यांना सांगितलं, “हे संत्र ग्लासमधून बाहेर काढा, पण पाण्याचा एक थेंबही सांडता कामा नये.” ऐकायला अगदी सोपं वाटणारं हे काम प्रत्यक्षात मात्र इतकं कठीण ठरलं की विद्यार्थ्यांचे सगळे प्रयत्न निष्प्रभ ठरले.

व्हिडीओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग समजावून सांगतात. संत्र ग्लासमध्ये ठेवल्यावर पाणी पूर्ण काठोकाठ भरलेलं दिसतं. विद्यार्थी विविध कल्पना सुचवतात. कोणी चमच्याने काढण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी बोटांनी पकडून उचलायचा प्रयत्न करतो. पण, प्रत्येक वेळी पाणी ओसंडून बाहेर येत होतं. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हास्य आणि आनंद स्पष्ट दिसतो. शिक्षक विद्यार्थ्यांना शेवटी सांगतात की हा प्रयोग केवळ मजेसाठी नाही, तर त्यामागे ‘विस्थापन’ (Displacement) या वैज्ञानिक संकल्पनेचे एक सुंदर उदाहरण आहे.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही तासांतच व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकाने लिहिले, “हुशार मुलगी!” तर दुसऱ्याने म्हटले, “ज्याने तिला मिठी मारली – ती खूप गोड आहे.” एका वापरकर्त्याने म्हटलं, “जिनं आपल्या आनंदात मैत्रिणीला मिठी मारली, तिनं सगळ्यांची मनं जिंकली.” एका महिला वापरकर्त्याने अभिमानाने लिहिले, “आम्ही महिला प्रतिभावान आहोत!” तर काहींनी वर्गाचे कौतुक करत लिहिले, “मला आवडले की वर्गात कोणीही तिची चेष्टा केली नाही.” एका नेटकऱ्याने विनोदी कमेंट केली, “पण पाणी थोडं कमी झालंय ना!”

हा व्हिडीओ केवळ मनोरंजन नाही तर विचार करायला लावणारा आहे. तो शिकवतो की शिक्षण फक्त पाठ्यपुस्तकात नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं जास्त प्रभावी असतं. विज्ञानाचा मजेदार प्रयोग असो वा विचारशक्ती वाढवणारा ब्रेन गेम; या शिक्षकाने मुलांच्या मनात शिकण्याची आणि शोधण्याची जिज्ञासा पेटवली आहे, त्यामुळेच हा छोटासा वर्गातील क्षण आता संपूर्ण इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.