Hyderabad School Accident Video: तेलंगणामधील एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. हैदराबादच्या दुंडिगल परिसरात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. केवळ सहा वर्षांचा चिमुकला अभिमंशू रेड्डी याचा स्कूटर आणि मोठ्या टिपर ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. अधिक धक्कादायक म्हणजे, ही संपूर्ण घटना त्याच्या आईसमोर घडली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजता घडली. आई आणि मुलगा स्कूटरवरून शाळेकडे जात असताना ट्रकने धडक दिल्याने आईचा स्कूटरवरील ताबा सुटला. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतं की अभिमंशू स्कूटरच्या समोर उभा होता. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकमुळे स्कूटरवरील आईचा ताबा सुटला आणि दोघंही रस्त्यावर पडले आणि काही क्षणांतच अभिमंशू ट्रकच्या चाकाखाली गेला. आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
ही भयावह घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात मोठा गोंधळ उडाला. आई रस्त्यावर ढसाढसा रडत होती. काही लोकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मुलाचा डोळ्यासमोर झालेल्या मृत्यूने ती पूर्णपणे कोलमडली होती. व्हिडीओत दिसतं की, मुलाला ट्रकखाली जाताना पाहून ती हतबल झाली असून, काय करावं हेही तिला समजत नाही. अहवालानुसार, मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
शाळेजवळील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या वाहनांसाठी विशिष्ट वेग मर्यादा आणि मार्ग बंधनं असतात. मात्र, अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचे दुष्परिणाम असे जीवघेणे ठरतात.
मृत अभिमंशू रेड्डी हा बोरमपेटमधील गीतांजली शाळेमध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव निजामाबाद जिल्ह्यातील निजामाबाद मंडल आहे. ते सध्या मल्लमपेटमधील आकाश लेआउट येथे वास्तव्यास आहेत. अभिमंशूचे वडील राजू हे या अपघातामुळे पूर्णपणे खचून गेले आहेत.
अपघातानंतर चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दुंडिगल पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, कारण घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
येथे पाहा व्हिडीओ
या घटनेवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी ट्रकचालकावर संताप व्यक्त केला असतानाच, काहींनी आईवरही जबाबदारी टाकली आहे. “रस्त्यावर लहान मुलासोबत स्कूटर चालवत असताना जास्त काळजी घेतली पाहिजे होती,” असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.