Alarming CCTV Footage Viral: सध्या देशभरात रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास ही मोठी समस्या बनली आहे. अनेक ठिकाणी हे कुत्रे रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध यांच्यावर हल्ले करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ती फक्त तीन वर्षांची होती. एका निष्पाप पावलांनी दुकानाकडे चालली होती. पण काही क्षणांतच रस्त्यावर घडला असा थरार की, अंगावर काटा येईल. व्हायरल व्हिडीओनं सध्या संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. व्हिडीओमध्ये दिसतेय एक लहान मुलगी, एकटीच, अनोळखी रस्त्यावर आणि तिच्यावर अचानक तुटून पडते भटक्या कुत्र्यांची झुंड. कुत्र्यांनी मुलीवर केलेल्या हल्ल्याचे क्षण पाहून अंगावर भीतीनं काटा येईल. खरंच, रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे.
ही धक्कादायक घटना कर्नाटकमधील हुबळी येथील आहे. येथे तीन वर्षांची एक चिमुरडी मुलगी घराजवळच्या दुकानात गेली होती. ती दुकानातून परत येत असतानाच काही भटके कुत्रे तिच्यामागे लागले आणि अचानक तिच्यावर तुटून पडले. तिचं कुणीही संरक्षण करत नव्हतं. कुत्र्यांनी तिला जमिनीवर पाडलं आणि ते तिला फरफटत नेऊ लागले.
कुत्र्यांनी तिचा खांदा, पाठ, हात व पायांवर चावे घेतले. कुत्र्यांच्या त्या जीवघेण्या हल्ल्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि तो पाहून कोणाच्याही काळजाला घरं पडतील.
जखमी मुलीला तातडीनं KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवानं तिचा जीव वाचला; पण ती आणि तिचं कुटुंब अजूनही या घटनेच्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. ही घटना हुबळी-धारवाड महानगरपालिका वॉर्ड क्र. ३४ येथील आहे. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या आणि प्रभाग प्रतिनिधींच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे. त्यांचा आरोप आहे की, प्रशासन वेळेवर उपाययोजना करीत नाही. त्यामुळे अशा धोकादायक प्रकारांमध्ये निष्पाप जीव भरडले जात आहेत.
या घटनेपूर्वीही अशाच अनेक घटना देशभरातून समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील कल्याण येथे एका वृद्ध महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं.
येथे पाहा व्हिडीओ
काहीतरी भयंकर घडण्याची वाट बघायची का?
या व्हायरल व्हिडीओनं एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे. प्रशासनाला जाग कधी येणार? अजून किती निष्पाप जीव भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा बळी ठरणार? हा धक्कादायक व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? एकटी मुलगी आणि तिच्यावर अचानक झालेला हल्ला… पाहा Video आणि लक्षात घ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकतं ते.