Shocking News: मुंबईजवळील नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, जी काही दिवसांपासून चर्चेत आहे. हावर्ड इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका निदा निजाउद्दीन यांनी एका ८ वर्षांच्या मुलाच्या गुप्तांगावर वास येतो म्हणून कॉलिन (घरगुती काच स्वच्छ करणारे रसायन) फवारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जेव्हा पालकांनी याबाबत तक्रार करून शिक्षिकेकडून माफीनामा मागितला, तेव्हा राज्य शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेच्या वागणुकीत गंभीर चूक आढळून आली आणि शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना (Nalasopara Teacher Colin Spray)
ही धक्कादायक घटना २३ जुलै रोजी समोर आली. एका शिक्षिकेने वर्गात दुर्गंधी असल्याच्या कारणास्तव ८ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर ‘कॉलिन’ स्प्रे फवारल्याचा आरोप आहे. जेव्हा विद्यार्थ्याच्या पालकांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी शिक्षिकेला माफी मागण्यास सांगितले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना समजताच पालक आणि स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली. @unexplored_vasai नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून संपूर्ण घटनेची माहिती दिली, ज्यामुळे इंटरनेटवर संतापाची लाट उसळली.
राज्य शिक्षण विभागाकडून चौकशी
हावर्ड इंग्लिश स्कूलमधील ही घटना राज्य शिक्षण विभागाच्या जेव्हा लक्षात आली, तेव्हा असे समोर आले की, शाळा औरंगाबादच्या दुसऱ्या शाळेच्या नावाने लिव्हिंग सर्टिफिकेट (LC) देत होती. त्यामुळे हावर्ड स्कूलची नोंदणी आणि ती कायदेशीर आहे का याबाबत गंभीर शंका निर्माण झाली. कारण तो विद्यार्थी तिथे ३ वर्षं शिकलेला होता.
शाळा बंद करण्याचे आदेश
या अहवालानंतर पालघर जिल्हा परिषदेने तालुका स्तरावर चौकशीचे आदेश दिले. चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर शाळेला नोटीस दिली गेली आणि ती तत्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
‘मुंबई मिरर’मधील माहितीनुसार, पालघर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणाले, “शाळेला बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर नोटीस दिल्यानंतरही शाळा सुरूच ठेवली गेली, तर शाळेविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला जाईल.”
‘मुंबई मिरर’शी बोलताना पीडित विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं, “विभागानं लवकर कारवाई केली याचा मला आनंद आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे आणि अशी घटना इतर कोणाबरोबरही घडू नये.”
पालक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक आज गुरुवारी (३१ जुलै) मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
युजर्सनी शिक्षिकेच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “जर शिक्षक असा विचार करीत असतील आणि विद्यार्थ्यांना अशी वागणूक देत असतील, तर ते शिक्षक होण्यास लायक नाहीत.” तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “हावर्ड स्कूल माझ्या भागात आहे आणि ती एका रहिवासी इमारतीतील फक्त एक छोटी खोली आहे. ही शाळा म्हणून कशी ज्ञात आहे, काय माहीत?”