Road Collapse Car Accident Ciral: पावसाळा सुरू झाला की रस्त्यांच्या दुरवस्थेच्या बातम्या नेहमीच समोर येतात. कुठे डांबर उखडलं तर कुठे मोठाले खड्डे तयार होतात. पण, आता सोशल मीडियावर असाच एक थरारक VIDEO जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर शहारे येतील.

कल्पना करा… तुम्ही रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि काही क्षणांतच ती डोळ्यांदेखत जमिनीत गायब झाली तर? नेमकं असंच एक थरारक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय, हा थरार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काय घडलं जाणून घ्या…

या व्हिडीओमध्ये दिसतंय की, रस्त्याच्या कडेला एक कार अगदी साध्या पद्धतीने उभी आहे. मात्र, काही क्षणांतच परिस्थिती बदलते. कारच्या मागच्या बाजूचा भाग हळूहळू खाली दाबला जाऊ लागतो आणि बघता बघता संपूर्ण कार जमिनीत गडप होते. पाहणाऱ्यांसाठी हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षाही भयानक होता.

कसं घडलं हे सगळं?

व्हिडीओ नीट पाहिल्यावर लक्षात येतं की ज्या ठिकाणी कार उभी होती, सततच्या पावसामुळे तेथील मातीची पकड सैल झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कारचं वजन जमिनीला सहन झालं नाही. हळूहळू जमीन ढासळली आणि वाहन पूर्णपणे आत ओढलं गेलं. काही सेकंदांत डोळ्यांसमोर घडलेला हा प्रसंग पाहून लोक अक्षरशः थक्क झाले.

कुठल्या शहरातला आहे हा VIDEO?

सध्या तरी या व्हिडीओचं ठिकाण स्पष्ट झालेलं नाही. पण आजूबाजूचं वातावरण, रस्त्यांच्या बांधकामाचा प्रकार बघून हे भारतातलंच एखादं शहर असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, सोशल मीडियावर लोक या घटनेवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

काहींचं म्हणणं आहे की, पावसाळ्यात पावसाळ्यात अशा धोकादायक दुर्घटना घडत असतात; तर अनेकांनी यासाठी नगरपालिकेच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं आहे. योग्य देखभाल आणि मजबूत रस्ते बांधले गेले असते तर असा प्रकार कधीच घडला नसता, असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.

दरवर्षी दिसतो असा थरार

हे पहिल्यांदाच झालेलं नाही. देशभरात पावसाळ्याच्या दिवसांत अशा अनेक घटना घडताना दिसतात. कुठे गाड्या मोठ्या खड्ड्यांत अडकतात, तर कुठे रस्ताच अचानक कोसळून अपघात होतात. हा नवा व्हिडीओ त्या सगळ्या भीषण घटनांचीच आठवण करून देतो.

सावधान!

पावसाळ्यात रस्त्यांवर वाहन उभं करताना किंवा चालवताना अधिक दक्षता घेणं अत्यावश्यक आहे, कारण पुढच्या क्षणाला नेमकं काय होईल याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही. हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना पुन्हा एकदा याचीच जाणीव करून देतो आहे.