Python Attack Man Video : सेल्फीच्या नादात लोक काहीही करताना दिसतात. अनेकदा एका सेल्फीसाठी लोक स्वत:चा जीव धोक्यात घालतात. कधी डोंगर दऱ्यांमध्ये तर कधी बाईक, कारमध्ये स्टंटबाजी करताना सेल्फी घेताना अपघाताच्या घटना घडतात, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. अनेकांना जीवघेण्या आणि धोकादायक प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह होतो. अशाच प्रकारे एका तरुणाला रेस्क्यू केलेल्या अजगराबरोबर सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. त्याची एक चूक चांगलीच महागात पडली आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात एक तरुण अजगरासह सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. पण, पुढच्याच क्षणी अजगर तरुणावर हल्ला करतो. अजगराचे रेस्क्यू केल्यानंतर जंगलात सोडत असताना ही घटना घडली, यावेळी अजगराला पाहण्यासाठी लोकांचीदेखील गर्दी जमा झाली होती.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बचाव कर्मचारी अजगराच्या मानेला धरून असल्याचे दिसतेय. याचदरम्यान एक तरुण अजगराच्या जवळ जाऊन त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. पण, सेल्फी घेत असतानाच अजगर अचानक त्याच्या खांद्यावर जोरात हल्ला करतो. सुदैवाने बचावकर्त्याने अजगराला हातातून सोडले नाही, ज्यामुळे तरुण त्याच्या तावडीतून सुखरुप सुटला. हे दृश्य पाहताना खरंच काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाही.
अजगराच्या हल्ल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ @streetdogsofbombay नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात लोकांना इशारा दिला आहे की, वन्य प्राणी हे काही खेळणं नाहीत किंवा आपल्या मनोरंजनाचे साधन नाहीत. दरम्यान, अनेकांनी अजगराला सुरक्षितपणे हाताळणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे; तर अनेकांनी अशाप्रकारे धोकादायक प्राण्याबरोबर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही म्हटले आहे.
सोशल मीडिया युजर्सही या घटनेवर कमेंट्स करत आहेत. एका युजरने त्या तरुणाची खिल्ली उडवत लिहिले की, अजगर म्हणत असेल – काय भावा, मज्जा आली का? तर दुसऱ्याने म्हटले की, घ्या आणखी एक सेल्फी घ्या… लव्ह बाईट मिळाला का?