नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागिरकांनी पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बँकेच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून बँकेबाहेर हेच चित्र पाहायला मिळत आहे अशातच एका एटीएम बाहेरच्या व्हायरल झालेल्या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. कारण या रांगेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता डुक्कराच्या पिल्लासोबत रांगेत उभा होता.
तेलगूमधले प्रसिद्ध अभिनेते रवि बाबू एटीएमच्या रांगेत पैसे काढण्यासाठी उभे होते त्यामुळे त्यांना चक्क रांगेत पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या, पण त्यातूनही त्यांच्यासोबत डुक्कराच्या पिल्लाला पाहून तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पैसे काढण्यासाठी आपल्या अनोख्या कंपनीसोबत ते रांगेत उभे होते. त्यांचा फोटो काढण्याचा मोह अनेकांना अनावर झाला, अर्थात त्यानंतर तो ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरही व्हायरल झाला. एका अभिनेत्याला तेही डुक्करासोबत रांगेत पाहण्याचा योग नागरिकांनाही पहिल्यांदाच आला असेल. रवि यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना याबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी आपण डुक्करांना घरात पाळल्याचे सांगितले. रवि यांच्या पाळीव डुकराचे नाव ‘बंटी’ असून ते जिथे जिथे जातील तिथे त्याला सोबतच घेऊन जातात.
वाचा : बँका आणि एटीएमध्ये रांगा लावण्यासाठी ‘येथे’ माणसे भाड्याने मिळतात
रवि यांनी नुकताच एक चित्रपट केला. पंचवीस डुक्करांवर आधारित तो चित्रपट आहे. त्यातील हे एक पिल्लू आहे. रवि या पिल्लाला आपल्या घरातच ठेवतात. त्याची काळजी घ्यायला कोणीही नसल्याने ते जिथे जातील तिथे या पिल्लाला सोबत नेतात. त्या दिवशी गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी त्यांना पैसे हवे होते म्हणून ते रांगेत उभे राहिले. रवि यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर #Ravibabu हा हॅशटॅग देखील ट्रेंडिंगमध्ये होता.