Success Story Of Pradeep Kannan : स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, उत्तम व्यवहार आदी बऱ्याच गोष्टी लागतात. पण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास असावा लागतो. हातातील नोकरी सोडून, एकही रुपया नसताना व्यवसाय करण्यासाठी मोठी झेप घ्यावी लागते. तर आज असेच काहीसे एका व्यक्तीने केले आणि आज भारत व दुबईमध्ये १८ हून अधिक दुकाने चालविताना दिसत आहेत.

ओरॅकल इंडियामध्ये ऑपरेशन्स हेड म्हणून प्रदीप कन्नन काम करीत होते. बंगळुरूमध्ये टेक-कर्मचाऱ्याची चांगल्या पगाराची नोकरी आणि आरामदायी जीवन सुरू असतानाही २०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मनातील स्वतःचं काहीतरी व्यवसाय करण्याची अपूर्ण इच्छा पूर्ण केली. फालुदा आणि आइस्क्रीम विकण्यासाठी तमिळनाडूतील करूर या त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय घेतल्यानंतर अनेक लोक हसले. काहींनी म्हटलं, “याचं काही खरं नाही आता”. पण, प्रदीप कन्नन यांनी स्वतःच्या कामावर लक्ष दिलं आणि सहा वर्षांनंतर फालुद्याची छोटी दुकानं आता भारत आणि दुबईमध्ये मिळून १८ पेक्षा जास्त शाखांपर्यंत पोहोचली आहेत.

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी धाडस लागतं (Viral Post)

त्यांचा हा प्रवास एका छोट्या दुकानापासून सुरू झाला, जो हळूहळू ‘द फालुदा शॉप’मध्ये रूपांतरित झाला. आता संपूर्ण भारत आणि अगदी दुबईमध्ये १८ हून अधिक दुकानं चालवीत आहेत. तसेच आता आकर्षक व लोकप्रिय D2C (Direct-to-Consumer) आइस्क्रीम ब्रँड तयार करण्यासाठी काम करीत आहेत. त्यांचा प्रवास छोट्या गावातील स्वप्नांपासून सुरू झाला आणि नंतर मोठ्या कंपनीच्या ऑफिसपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांनी फ्रँचायजीच्या स्वयंपाकघरांमध्ये काम केलं आणि आता त्यांची उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचली आहेत.

पोस्ट नक्की बघा…

https://www.linkedin.com/posts/pradeepkannan-j_everyone-told-me-i-was-living-the-dream-activity-7389971928385720320-1chY?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy

success story

सोशल मीडियावर ही पोस्ट @Pradeep Kannan यांच्या linkedin अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. अनेक युजर्सनी पोस्ट पाहून त्यांच्या निर्णयाचं आणि समर्पणाचं कौतुक केले आणि “कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी धाडस लागतं. शाब्बास”, “अभिनंदन! एखाद्याला ९-५ च्या नोकरीतून बाहेर पडताना आणि काहीतरी नवीन करताना पाहणं खूपच प्रेरणादायी आहे”, “जो नोकरी सोडतो, तो साम्राज्य निर्माण करतो, दुबईमध्ये फालुदा विकतो” आदी अनेकविध कमेंट्स केलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रदीप कन्ननच्या प्रवासातून हे दिसून आलं की, कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवण्यामुळे असे दरवाजे उघडतात, जे ठोकण्यास तुम्ही बराच काळ विचार करीत बसलेले असता.