आजकाल सोशल मीडियावर एखाद्या कंपनीतील कर्मचारी आणि बॉस यांच्यांशी संबंधित अनेक घटना व्हायरल होत असतात. यामध्ये कधी कर्मचाऱ्याने बॉसला सुट्यांसाठी केलेला मजेदार अर्ज, तर कधी बॉसच्या स्वभावाला कंटाळून कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा, अशा अनेक घटना आपण याआधी पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण सध्या अशी एक घटना समोर आली आहे. जी वाचल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

हो कारण एका कंपनीने कर्मचाऱ्यांनी दिलेलं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून त्यांना चक्क कारले खाण्याची शिक्षा केली आहे. ही अनोखी आणि विचित्र शिक्षा दिल्याची घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याचा नेटकरी निषेध करत आहेत. तर ही शिक्षा दिल्याच्या घटनेचा व्हिडीओ एका कर्मचाऱ्याने शूट करुन अपलोड केला होता, जो आता व्हायरल होत आहे. मात्र, बॉसने हा निर्णय सर्वांच्या संमतीने घेतल्याचंही एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

हेही पाहा- देवाच्या दारात सैतानी कृत्य! केदारनाथ यात्रेदरम्यान घोड्याला जबरदस्ती सिगारेट ओढायला लावली अन्…, संतापजन Video व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चीनच्या जिआंगसू येथील आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ज्या कंपनीमध्ये ही घटना घडली आहे, तिचे नाव सुझोउ डनाओ फांगचेंगशी इन्फॉर्मेशन कन्सल्टिंग असं आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून त्यांना अनेक कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून कारली खायला दिली.

चायनीज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक कर्मचारी कारले खाताना दिसत आहेत. कंपनीने या शिक्षेला रिवार्ड आणि पनिशमेंट असं नावं दिलं होतं. तर कर्मचाऱ्यांनीदेखील या शिक्षेला होकार दिल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी या शिक्षेला विरोध केला होता.