आपल्या देशात इंजिनिअरच्या जितक्या नोक-याही नसतील त्यापेक्षाही दुप्पट विद्यार्थी इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडतात असे नेहमीच उपहासाने बोलले जाते. डोळ्यात तेल घालून उज्वल भविष्याची स्वप्न बघत इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करायचा पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर मात्र हाती निराशाच ही आजची परिस्थिती आहे. भटिंडामध्ये राहणा-या एका २५ वर्षीय इंजिनिअरवरही अशीच दुर्दैवी वेळ आली होती. नोकरी मिळत नसल्याने रेल्वे स्थानकावर कुलीची नोकरी सुरु ठेवण्याची वेळ त्याच्यावर आली.
मोने लाल सिंह याने २०१५ मध्ये आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. २०१२ पासून घरचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी तो भटिंडा रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरी आपल्याला चांगली नोकरी मिळेल आणि घरची परिस्थिती बदलेल अशी त्याची अपेक्षा होती. पण ठिक ठिकाणी अर्ज करूनही शिक्षणाला अनुरुप अशी नोकरी त्याला मिळेना त्यामुळे निराश झालेल्या मोने लाल याने कुलीचे काम पुढे  सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. उत्तम इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी बोलता येणा-या मोनेबद्दल अनेकांना कुतूहल होते. येथे काम करण्या-या सगळ्याच कुलीमध्ये मोने हा उच्चशिक्षित आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत आपले वडील शिपाई असून घरात चार बहिणी आणि दोन भाऊ असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे इतक्या मोठ्या कुटुंबाचा भार वाहण्यासाठी आपण वयाच्या २१ व्या वर्षापासून कुलीची नोकरी करत असल्याचे तो म्हणाला. त्याच्या या बातमीची दखल घेत पंजाबमधल्या एका विद्यापीठाने त्याला नोकरी देऊ केली आहे. मोने लाल याचे शिक्षण लक्षात घेऊन त्याला अनुरुप अशी नोकरी देण्याचे आश्वासनही या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे कदाचित आता तरी आपल्याला चांगले आयुष्य जगता येईल अशी आशा मोने याने व्यक्त केली आहे.