नोटाबंदीच्या निर्णयाला आता १३ दिवस उलटले आहेत. कित्येकांच्या हाती २००० आणि ५०० ची नवी नोट आली नसली तरी या नव्या नोटांची प्रतिमा असलेली पैशांची पाकीटे बाजारात आली आहेत अशा चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून या नव्या नोटांची प्रतिमा असलेली पाकीटे सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. या पाकिटांवर नव्या पाचशे आणि २ हजारांच्या नोटांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. एका ट्विटवर अकाउंटवर पोस्ट झालेला हा फोटो अल्पवधीतच व्हायरल झाला. काहींनी ही पाकीटे चिनमध्ये तयार करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर ईबे या ऑनलाईन संकेतस्थळावर तर २००० च्या नोटेची प्रतिमा असलेले मोबाईल कव्हर देखील विक्रिसाठी ठेवण्यात आले होते. इथे कित्येकाच्या हातात नवी नोट आली देखील नाही पण चिनने मात्र या संधीचा पुरेपुर फायदा घेऊन या नोटांचा प्रतिमा असेलली पाकीटे बाजारात आणली आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

महिन्याभरापूर्वी चिनमध्ये तयार करण्यात अशीच ५०० आणि १००० च्या नोटांची प्रतिमा असलेली पाकीटे बाजारात आली होती. २० ते ३० रुपयांना मिळणारी ही पाकिटे मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनवर उपलब्ध होती. अगदी हुबेहुब  ५०० आणि १००० च्या नोटांच्या बंडलाप्रमाणे दिसणारी ही पाकीटे अनेकांनी खरेदी केली होती.