टोयोटा फॉर्च्यूनर ही एक्सयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. अर्थात ही गाडी ऑन रोडसोबतच ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठीही फार लोकप्रिय आहे. फोर्डच्या एण्डेव्हर, महिंद्राच्या अल्टॉरस जी फोर आणि एमजी ग्लोस्टर या गाड्यांशी फॉर्च्यूनरची थेट स्पर्धा आहे. या सेगमेंटमध्ये गाड्यांच्या विक्रीची स्पर्धा फार असली तरी फॉर्च्यूनरने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याने या गाडीचा ग्राहकांकडून कायमच मागणी असते. मात्र सध्या ही गाडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ.

नक्की वाचा >> मका आणि सोयाबीनच्या मोबदल्यात टोयोटा फॉर्च्यूनर; कंपनीने शेतकऱ्यांसाठी आणली विशेष ऑफर

या व्हिडीओमध्ये एकजण समुद्रकिनाऱ्यावर टोयोटा फॉर्च्यूनर चालवण्याचा आनंद घेत असतानाच गाडी उलटल्याचं पहायला मिळत आहे. गाडी चालवणारा चालक पॉवर स्लाइड करण्याचा प्रयत्न करत होता. गाडीसोबत स्टंटबाजी करताना वापरल्या जाणाऱ्या खूप कॉमन गोष्टींमध्ये पॉवर स्लाइडचा समावेश होतो. गाडी वळवतानाच अॅक्सेलेटर देऊन तिला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. सामान्यपणे एकाद्या वळणावर किंवा मोकळ्या जागी कार शौकीन अशी स्टंटबाजी करतात. मात्र या व्हिडीओमध्ये चालक समुद्राच्या किनारी अगदी लाटा येतात तिथपर्यंत जाऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत होता. एका प्रयत्नामध्ये तो लाटा येत असताना गाडी वळवण्याचा प्रयत्न करतो मात्र किनाऱ्यावरील वाळू पाण्यासोबत वाहून गेल्याने गाडी डावीकडे कलंडते. पॉवर स्लाइड करताना गाडी वेगात असणं गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी समुद्राच्या लाटा चाकांवर धडकल्याने वेग मंदावल्याने गाडी पडते असं दिसून येतं.

नक्की पाहा  >> Video: …अन् चक्क गाढवाने खेचली ३४ लाखांची Ford Endeavour ही आलीशान कार

गाडी पलटी होण्यामागील अजून एक कारण म्हणजे फॉर्च्यूनर ही एक एक्सयूव्ही असून तिचा ग्राऊण्ड क्लियरन्स अधिक आहे. त्यामुळेच वळणावर चालवताना ती योग्य पद्धतीने वळत आहे की नाही तसेच गुरुत्वाकर्षण आणि वजनाबरोबरच वेगासंदर्भातील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अती उत्साहामध्ये एखाद्या ठिकाणी जोरात गाडी वळवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि गाडीला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. तोच प्रकार या ठिकाणी घडला. गाडी पलटी झाल्यानंतर हा व्हिडीओ शूट करणारे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील अनेकजण या गाडीकडे धावत जाताना दिसत आहेत. सर्वजचजण जाऊ या गाडीच्या चालकाला काही झालं नाही ना ते पाहतात आणि त्याला गाडीबाहेर काढतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या युट्यूबवर चर्चेत आहे.

या अपघातामध्ये चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसली तरी हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे हे मात्र नक्की. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचं स्पष्ट होत असून अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्यात.