Tourist Viral Video: शाळकरी मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून, त्यामुळे मुलं आता आपल्या पालकांबरोबर फिरायला जाण्याच्या तयारीत आहेत. पण, बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं की, राहण्याची सोय बघावी लागते. तिथे जेवण आणि राहण्याची व्यवस्था कशी असेल? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. मग बाहेर जायचं म्हटलं की, राहण्यासाठी बरेच जण हॉटेलचा पर्याय निवडतात. आपली आवड आणि बजेट यांनुसार हॉटेलची रूम बुक करून लोक तिथे राहतात. आजकाल हॉटेल रूम्स बुक करताना बऱ्याच जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये काही लोकांना लाखोंचा चुनाही लागला. हॉटेल रूम बुक करताना लोकांसोबत स्कॅम होऊ शकतं. आपली अशी फसवणूक होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर हॉटेलची रूम बुक करताना विशेष काळजी घ्या.
इंटरनेटवरील आकर्षक व्हिडीओ आणि रील्स पाहून हाॅटेल्स बुक करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. बऱ्याचदा फिरायला जाण्यापूर्वी लोक आॅनलाइन पद्धतीनं हॉटेल बुक करतात. हॉटेल परिसर आणि खोल्या सुंदर आकर्षक वाटल्या की, कोणताही विचार न करता लगेच बुक करून घेतात. पण, जे तुम्हाला व्हिडीओ किंवा फोटोमध्ये जे दाखवलं जातं, ती फसवेगिरीही असू शकते. आता असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जोडपं एका पर्यटनस्थळी गेल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या उडालेल्या चेहऱ्यावरून असं लक्षात येतं की, या जोडप्यानं इंटरनेटवर सर्च करून थांबण्यासाठी एक हाॅटेल बुक केलं. इंटरनेटवर त्यांना या हाॅटेलचा लूक सी फेसिंग बाल्कनी असलेल्या खोल्या दाखवण्यात आल्या होत्या. पण, खरं तर याच्या उलट झालं. जेव्हा हे जोडपं पर्यनस्थळी येऊन या हाॅटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बाल्कनी तर दूरची गोष्ट राहिली, त्या खोलीला खिडकीसुद्धा नव्हती. खरं तर भिंतीवर समुद्राचं एक पोस्टर लावण्यात आलं होतं. थोडक्यात समुद्राचं पोस्टर दाखवून हाॅटेलवाले ग्राहकांची फसवणूक करू लागले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
Mukund_mane या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखोंहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत. अशा पद्धतीनं फसवणूक करणाऱ्या हाॅटेलमालकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.