सोशल मीडियामुळे अनेक लोकांची फसवणूक केली जाते. शिवाय त्यामुळे सायवर क्राईमचे प्रमाणही वाढले आहे. पण याच सोशल मीडियामुळे पोलिसांना एका वॉन्टेड आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीने अनेक लोकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो वॉण्टेड होता. शिवाय हा आरोपी पूर्वी शेतकरी म्हणून काम करायचा. पण आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडण्यास कारण ठरलं आहे डेटिंग अॅप, हो हे वाचायला कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण त्याने डेटिंग अॅपवर त्याची प्रोफाईल बनवल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर नेमकं हे प्रकरणं आहे काय ते जाणून घेऊया.
हे प्रकरण इंग्लंडमधील सफोल्क येथील असून वॉन्टेड आरोपीने match.com नावाच्या साईटवर त्याची प्रोफाईल बनवली होती. न्यूयॉर्क पोस्टने त्यांच्या रिपोर्टमध्ये जेम्स प्रेसचा हवाला देत म्हटलं आहे की, ३५ वर्षीय व्यक्तीला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लोकांचे ९,७०,००० डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. हे पैसे पुरवठादारांचे होते. या प्रकरणानंतर त्याला फेब्रुवारीमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र तो न्यायालयात हजर झाला नाही आणि तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो कुठेच सापडत नव्हता. पण या फरार असणाऱ्या आरोपीने जेव्हा स्वत:ला जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केली तेव्हा तो पोलिसांना सापडला. सफोल्क काउंटी कौन्सिलच्या प्रवक्त्याने सांगितलं की, असे मानले जाते की वायने पार्कर, जो पळून गेलेला दोषी आहे, तो डेटिंग वेबसाइट वापरत होता.
आधीपासून चालू होता खटला –
सफोल्क ट्रेडिंग स्टँडर्ड्सचे प्रमुख ग्राहम क्रिस्प म्हणाले, “तो पोलिसांपासून पळून जाण्यासाठी वाहने भाड्याने घेत होता.” तो म्हणत होता की, आपण सफोल्कमध्ये परत येऊन केलेल्या कृत्याची शिक्षा भोगेल. मात्र तो कधीच परतला नाही. उशिरा का होईना पोलीस त्याला अटक करणार हे माहीती होते. मात्र, त्याने लवकरात लवकर स्वतःला आमच्या स्वाधीन करावे अशी आमची इच्छा होती.
बोवाइन क्षयरोग पसरवण्याचा गंभीर धोका निर्माण केल्याबद्दल त्याच्यावर आधीच खटला सुरू आहे. तो जनावरांच्या संगोपनाचा योग्य मार्ग वापरत नव्हता. शिवाय जनावरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांची योग्य पद्धतीने विल्हेवाटही लावत नव्हता. त्यामुळे त्याला फेब्रुवारी २०२० मध्ये त्याला १२ आठवडे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तसेच व्यवसाय करण्यावर १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती आणि १५५ डॉलर्सचा दंड ठोठावला होता.