पावसाळ्याच्या दिवसात बिळात पाणी शिरल्याने अनेक साप बाहेर पडतात. शिवाय ते निवाऱ्यासाठी कधी आपल्या घरात तर कधी ऑफिसमध्येही शिरतात. तर कधीकधी साप रस्त्यावर येतात आणि त्यांच्यावर जर एखाद्या माणसांचा चुकून पाय पडला तर ते त्यांना चावतातही. त्यामुळे पावसाळ्यात अशा सापांपासून सावध राहणे गरजेचे असते.
सध्या सापाचा असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक साप एटीएमच्या केबिनमध्ये शिरल्याचं दिसत आहे, सुदैवाने केबिनचा दरवाजा बंद असल्याने साप आत अडकतो, ज्यामुळे एटीएमशेजारी असलेल्या लोकांचा धोका टळल्याचं दिसत आहे. पण यावेळी साप कबिनमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्याला बाहेर येण्यासाठी रस्ता सापडत नाही. एटीएम केबिनमध्ये बंद असलेल्या या सापाची लांबी जवळपास १० फूट असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढा मोठा साप पाहून लोक घाबरल्याचंही दिलत आहे. हा साप अनेकदा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी कंटाळून तो पुन्हा मशीनच्या दिशेने गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
मशीनमध्येच साप घुसला –
हा साप हळूहळू एटीएम मशीनकडे जातो आणि मशीनवर चढतो आहे. यावेळी बाहेर उभे असलेले लोक सापाचा व्हिडीओ शूट करत असल्याचंही केबिनच्या काचेमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा साप मशीनच्या अगदी वरच्या टोकाला पोहोचतो. मशीनची स्क्रीन आणि कॅमेऱ्याजवळ एक काळी जागा त्याला दिसते त्यातूनच तो मशीनच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतो. दरम्यानस काही वेळातच हा साप बघता बघता मशीनच्या आत जातो, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर सध्या या भयानक घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.