Turtle Attacks Woman Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात तर काही फार भयानक असतात. अनेकदा काही प्राणी असे काही वागतात ज्याने नेटिझन्सची मने जिंकतात. पण काही वेळा त्यांचे वागणे हे विचार करण्यापलीकडचे असते. अशाच प्रकारे एका तहानलेल्या कासवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यातील शांतीप्रिय कासवाचे वागणे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातील कासव आपली तहान भागवल्यानंतर पाणी पाजणाऱ्या महिलेशी असे काही वागतो ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल.

कडक उन्हात माणसे तर सोडाच प्राणीही आता हतबल होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवावी, असे वारंवार सांगितले जाते. जेणेकरून आपल्यासह रस्त्यावरून जाण्या-येणाऱ्यांची, तहानलेल्या प्राणी-पक्ष्यांची तहान भागवू शकतो. अनेक वेळा तुम्हाला वाटेत लोक प्राणी-पक्ष्यांची तहान भागवताना दिसतात. तहानलेल्या कासवाला पाहून एका महिलेनेही असेच काहीसे केले. मात्र पाणी पिऊन झाल्यानंतर कासवाने अचानक उडी घेत महिलेवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ पहिल्यानंतर यूजर्सनाही धक्का बसला आहे.

तहानलेल्या कासवाने महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडीओ @strangemedia या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कासवाची तहान भागवताना महिला म्हणतेय की, कासवाला खूप तहान लागली होती. पण पाणी प्यायल्यानंतर ते कासव तिच्यावर हल्ला करते. कासवाचे असे वागणे आपल्यासाठी जितके धक्कादायक आहे तितकेच त्या महिलेसाठीही होते.

आत्तापर्यंत या व्हिडीओला १.६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ही पोस्ट ४.३ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे. याशिवाय ३८०० यूजर्सनी रिट्वीट केले असून ३९ हजार यूजर्सनी लाईक केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, हे कासव खोडकर निघाले. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, फोनमध्ये हा व्हिडीओ पाहून मी घाबरलो, मग त्या बिचाऱ्या महिलेचे काय झाले असेल? तीही घाबरली असावी. आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, कदाचित कासव म्हणत असेल की, खूप झाले, आता बस करा.