PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) अर्थात दुबईच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी शनिवारी (१५ जुलै) यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर अल नाहयान यांनी पंतप्रधान मोदींसाठी खास शाकाहारी जेवण आयोजित केले होते. राष्ट्राध्यक्ष अल नाहयान यांच्या ‘कसर-अल-वतन’ राजवाड्यात मोदींसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींसाठी बनवलेल्या खास मेन्यूची लिस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना जेवणात सर्वप्रथम हरीस (गहू) व खजुराचे सलाड देण्यात आले; जे स्थानिक भाज्यांसोबत दिले गेले. त्यानंतर स्टार्टरमध्ये ‘ग्रिल्ड (भाजलेल्या) भाज्यांसोबत मसाला सॉसेज देण्यात आले. तर, मेन कोर्समध्ये फुलकोबी, काळे मसूर, लोकल गहू आणि गाजर तंदुरीपासून बनवलेला पदार्थ देण्यात आला. तसेच स्थानिक हंगामी फळेही देण्यात आली. पंतप्रधान मोदींसाठी खास बनवण्यात आलेल्या मेन्यू कार्डच्या शेवटी- सर्व अन्न शाकाहारी असून, व्हेजिटेबल ऑइलमध्ये तयार केलेले आहे आणि त्यात डेरी प्रॉडक्ट किंवा अंडे असलेल्या प्रॉडक्टचा वापर केलेला नाही, असे नमूद केलेले होते. हे मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने कमेंटमधून ‘तूप का वापरले नाही’, असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या युजरने ‘हेच दुबईचं सौंदर्य’ आहे, असे म्हटले आहे. तसेच तिसऱ्या युजरने लिहिले, ‘ते इतरांच्या खाण्याच्या सवयींचा कसा आदर करतात हे दाखवले’.

यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी जेवणाबरोबरच पंतप्रधान मोदींच्या स्वागतामध्येही कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांनी जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून ओळख असलेल्या दुबईतील आयकॉनिक ‘बुर्ज खलिफा’ला भारतीय ध्वजाच्या रंगांनी सजवत मोदींचे जोरदार स्वागत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दुबईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान त्यांचे राष्ट्रपती भवन ‘कसर अल वतन’ येथे पारंपरिक स्वागत करण्यात आले. येथे यूएईचे राष्ट्राध्यक्ष अल नाहयान यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ऊर्जा, अन्नसुरक्षा व संरक्षण ही क्षेत्रे पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्याच्या केंद्रस्थानी होती, असे समजते. यादरम्यान दोन्ही देशांनी त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.