Viral Accident Video Maharashtra: एकाच रस्त्यावर तीन तासांत तब्बल १० अपघात… आणि हे सगळं कॅमेऱ्यात कैद. एकामागून एक दुचाकीस्वार रस्त्यावर घसरत पडताना दिसतोय… कोणी फेकलं जातंय, कोणी वाहनासकट उलटलं जातंय… आणि हे पाहून अंगावर काटा येतो. हा काही अॅक्शन सिनेमाचा सीन नाही, ही आहे पुण्यातील वास्तवात घडलेली घटना जिथे घसरड्या रस्त्यामुळे अक्षरशः अपघातांची मालिकाच घडवली.
त्या दिवशी जणू त्या रस्त्यावर संकटांची मालिका सुरू झाली होती. कोणी काही समजण्याच्या आत एकामागून एक वाहनं खाली घसरत गेली. लोकांनी पाहिलं; पण मदतीसाठी धावण्याआधीच दुसरा अपघात घडलेला असायचा. आणि हे सगळं… अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सीसीटीव्हीत कैद झालं. परिणाम? स्थानिक लोक घाबरून गेले, रस्त्यावरून जाणंही धोकादायक वाटू लागलं… आणि या सगळ्याच्या मुळाशी होती एका ट्रकची बेफिकिरी आणि प्रशासनाकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष. नेमकं काय घडलं त्या तीन तासांत? जाणून घ्या सविस्तर…
पुण्यातील देहू-येलवाडी रस्त्यावरून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तीन तासांच्या आत एका ठरावीक ठिकाणी तब्बल १० वेगवेगळे अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातांची धक्कादायक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अपघाताचं कारण काय?
ही घटना रविवारच्या दिवशी घडली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामागचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर चिखलाचा थर साचल्यामुळे अचानक त्या भागावर घसरण तयार झाली. असं सांगितलं जातंय की, एखाद्या डंपर किंवा ट्रकमधून रस्त्यावर चिखल सांडला गेला असावा आणि तो साफ केला गेला नाही. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घसरण तयार झाली आणि त्यावरून येणारी दुचाकी वाहने एकामागोमाग एक घसरून पडू लागली.
सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर आल्यावर गाडीवरील नियंत्रण गमावत आहेत आणि थेट रस्त्यावर फेकले जातायत. काही जणांना जेमतेम आपला तोल सावरता आलाय, पण काहींना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. सुदैवानं कोणत्याही अपघातात जीवितहानी झाली नाही; पण इतके अपघात एकामागोमाग घडल्यानं स्थानिक नागरिक घाबरले आहेत.
प्रशासनाची झोप आणि लोकांची धावपळ!
या घटनेनंतर प्रशासनावर स्थानिक नागरिक संतापले आहेत. त्यांनी आधीच प्रशासनाला रस्त्यावरील स्थितीची माहिती देऊन साफसफाईची विनंती केली होती. मात्र, कोणताही ठोस उपाय यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. परिणामी, अपघात होईपर्यंत कोणाकडूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर, अपघातांची मालिका पाहून नागरिकांनीच झाडू, बादल्या घेऊन रस्ता साफ करायला सुरुवात केली.
ही घटना म्हणजे केवळ एक अपघात नव्हे, तर ते आहे प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचं जिवंत उदाहरण. वेळेवर जर रस्त्याची सफाई झाली असती, तर कदाचित हे १० अपघात टाळता आले असते. स्थानिकांचा सवाल आहे– “आताच जर एवढी घसरपट्टी आहे. तर, पुढे एखादा जीव गेला, तर जबाबदार कोण?”
येथे पाहा व्हिडीओ
या धक्कादायक व्हिडीओनं संपूर्ण शहराला विचार करण्यास भाग पाडलंय – आपण रस्त्यावर चालतो तेवढेच सुरक्षित आहोत, जेवढं आपलं प्रशासन जागं आहे.