Mumbai Local Dahi Handi video: मुंबई लोकल ट्रेन म्हटली की, डोक्यात लगेच गर्दी, धावपळ आणि थकलेल्या प्रवाशांचे चेहरे, असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण यंदा जन्माष्टमीच्या निमित्तानं समोर आलं एक वेगळंच चित्र. सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असलेला एक VIDEO पाहून कुणाचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
लोकलच्या धावत्या डब्यात अचानक भजन सुरू होतं, टाळ्यांचा गजर, नाच-गाणं सुरू होतं आणि काही वेळातच एक गट दहीहंडी फोडताना दिसतो. मुंबई लोकलमध्ये असं दृश्य पाहून प्रवासी थक्क झाले, हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी दोन गटांत विभागले गेले. कुणाला हे दृश्य श्रद्धेचं वाटलं, तर कुणाला त्रासाचं… पण इतकं मात्र नक्की की हा प्रसंग पाहून तुम्हीही म्हणाल – “हे खरंच घडलंय का?”
दररोज लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये काही प्रवासी नुसतेच प्रवास करीत नव्हते, तर त्यांनी थेट डब्यातच जन्माष्टमीचा जल्लोष सुरू केला. भजन-कीर्तनाच्या सूरावटींनी गाडीत वेगळाच आध्यात्मिक रंग भरला. सीटवर बालरूप श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात विराजमान करण्यात आली होती. प्रवासी भक्तगण नाचत-गात भगवंताची आराधना करीत होते. अखेरीस ‘नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ अशा गजरात ट्रेनच्या आतच दहीहंडी फोडण्याची रीत पूर्ण करण्यात आली.
या अनोख्या सोहळ्याचे मोबाईलवर टिपलेले दृश्य जेव्हा इंटरनेटवर पोहोचले, तेव्हा लोक दोन गटांत विभागले गेले. एका बाजूला भक्तिभावाने भारावलेले युजर्स होते; तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणाचा असा वापर योग्य आहे का, असा प्रश्न करणारे लोकही होते. “भक्ती करायला इतरांना त्रास का द्यायचा?” असा थेट सवाल एका युजरने केला. तर दुसऱ्याने विचारले, “हे लोक आधीपासूनच या उद्देशानं चढले होते का की त्यांनी अचानक असा निर्णय घेतला?”
कामावर जाण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर नाराजीची झलकही स्पष्टपणे दिसून आली. काहींनी टोमणा मारला की, हे बहुतेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रुप असतात, जे पहिल्या स्टेशनपासूनच डब्यात ठाण मांडून बसतात. पण, रोज थकून घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी हा सोहळा नक्कीच डोकेदुखी ठरतो.
तरीसुद्धा या घटनेनं एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे की, खरी श्रद्धा म्हणजे नेमकं काय? ती व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक प्रवासाचं साधन योग्य व्यासपीठ ठरू शकतं का? मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही जीवनरेखा असली तरी भक्तिभावाचा हा नवा प्रयोग अनेकांसाठी कौतुकाचा, तर अनेकांसाठी त्रासदायक ठरला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
सध्या हा VIDEO सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून, श्रद्धा आणि सार्वजनिक व्यवस्था यांच्यातील सीमा कुठे आखायची याबद्दलच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे.