युद्धभूमीवर सैनिकांसोबत काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर सतत असते. आता शरीरात प्राण आहे पण कधी शत्रूच्या बंदुकीतून सुटलेली गोळी जीव घेईल सांगता येत नाही. कधी एखादा स्फोट होऊन शरीराच्या चिंधड्या उडतील हेही सांगता येत नाही. अमेरिकी सैन्याने नुकताच आपल्या मासिकातून प्रकाशित केलेले एक छायाचित्र इथली सारी भीषण परिस्थिती दाखवतो. हे त्या महिला छायाचित्रकाराने टीपलेले छायाचित्र आहे. हेच छायाचित्र टिपताना ती त्यामध्ये मारली गेली. आपल्या कॅमेरात टिपलेले तिचे हे शेवटचे छायाचित्र होते. तिच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी हे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
हिल्डा क्लेटन ही २२ वर्षांची अमेरिकी महिला. अमेरिकी सैन्याची ती कॅमेरावुमन होती. प्रत्यक्ष अफगाणिस्तानातील युद्धभूमीवर ती सैन्यासोबत काम करायची. या ठिकाणी सैन्याला आपातकालीन परिस्थितीत कसे काम करावे, याचे प्रशिक्षण दिले जात होते. या प्रशिक्षणाची छायाचित्रे टिपण्याचे काम हिल्डावर होते. भविष्यातल्या इतर सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी ते उपयोगी पडणार होते. पण प्रशिक्षण सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. भुसुरुंगाचा स्फोट झाला आणि तिथे उपस्थित असेलेले तीन अमेरिकी सैनिक मारले गेले. यावेळी हिल्डाही तिथे होती. या स्फोटात हिल्डाचा मृत्यू झाला. पण तिच्या कॅमेरात हे शेवटचे क्षण कैद झाले. मरतानाही तिने आपली कामगिरी चोख बजावली. २०१३ मध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर चार वर्षांनी अमेरिकी सैन्याने आपल्या मासिकात या छायाचित्राला प्रसिद्धी दिली. ही छायाचित्रे हिल्डाच्या कुटुंबियांकडे होते. ते आता मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे, त्याचबरोबर मासिकात या घटनेचे वर्णन देखील केले आहे. सैन्यासाठी काम करताना किती अडचणींना तोंड द्यावे लागते याचे कथन या अनुभवातून केले होते.