रील शूट करीत ती सोशल मीडियावर अपलोड करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. केवळ लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांच्याही डोक्यात रील्सच्या माध्यमातून फेमस होण्याचे भूत शिरले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रील्स व्हिडीओंना लाइक्स आणि शेअर्स वाढवण्याची स्पर्धा सुरू आहे. पण, आता शिक्षकांनाही रील्स बनवण्याची झिंग चढल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकांना रील्स स्टार बनण्याचे इतके वेड लागले होते की, त्यांनी शिकवणी सोडून चक्क शाळेत व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर त्यांनी रील्स व्हिडीओ लाइक्स आणि शेअर करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकला. हे प्रकरण लक्षात येताच पालकांनी संबंधित शिक्षिकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांवर व्हिडीओ लाइक्स करण्यासाठी दबाव
अमरोहा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून रोज रील्स बनवायच्या. यावेळी एक शिक्षक त्यांचे रील्स शूट करायचे. इतकेच नाही या शिक्षिका त्यांच्या रील्स व्हिडीओ लाइक आणि शेअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्टाग्राम अकाउंट ओपन करण्यासाठी भाग पाडत होत्या, असा आरोप केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रविपूजा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे शिक्षक आपल्या रील्स अपलोड करायचे. त्यासाठी शिक्षक शाळेत ड्युटीवर असताना रील्स व्हिडीओ शूट करायचे आणि ते लाइक्स करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकायचे, असा दावाही विद्यार्थ्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त करीत जिल्हा दंडाधिकारी (DM) यांच्याशी संपर्क साधत संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकारी गंगेश्वरी आरती गुप्ता यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षकांकडून मारहाण करण्याची धमकी
एका विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षक शाळेत रील्स रेकॉर्ड करायचे आणि विद्यार्थ्यांवर लाइक आणि शेअर करण्यासाठी दबाव टाकायचे. आम्ही असे केले नाही, तर आम्हाला मारहाण करण्याची धमकी दिली जात होती. आणखी एका विद्यार्थिनीने आरोप केला की, एका शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना भांडी घासण्यास, जेवण व चहा बनवण्याचे काम दिले जाते.
शिक्षकांच्या अशा वर्तनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेत म्हणावे तसे शिक्षण मिळत नसल्याची तक्रार केली आहे. अंबिका गोयल, पूनम सिंग, नीतू कश्यप अशी या शिक्षिकांची नावे असून, त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु, या प्रकरणाबाबत सोशल मीडियातून खूप संताप व्यक्त केला जात आहे.