Vande Bharat Shocking Video : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी चांगल्या सुविधांनी सुसज्ज अशी आधुनिक वंदे भारत ट्रेन सुरू केली, पण ट्रेन्स आधुनिक होत असल्या तरी रेल्वे परिसराची स्थिती मात्र ‘जैसे थे’च आहे. याच संबंधित एक व्हिडीओ वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यातील रेल्वे ट्रॅकजवळील दृश्य पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओची दखल आता रेल्वे सेवा आणि दिल्ली एनआरच्या डीएमएनही घेतली आहे. त्यांनी याबाबत त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण या व्हिडीओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊ…
प्रवासी सुखकर, आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास करताना दिसतात. या ट्रेन आतून सुविधांनी युक्त आणि अगदी चकाचक आहेत. पण ज्या ट्रॅकवरून या ट्रेन धावतात, त्याच्या आजूबाजूचा परिसर मात्र अतिशय घाणेरडा, अस्वच्छ असल्याचे दिसून येते. दरम्यान, या व्हिडीओतही तसेच दृश्य पाहायला मिळाले. @Trendulkar नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय की, मी दिल्लीहून चंदिगडला जाणारी वंदे भारत ट्रेन पकडली. पण, ही ट्रेन स्थानकावरून निघताच हे दृश्य पाहायला मिळाले. आपल्याला लवकरात लवकर युद्धपातळीवर कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. खरोखरच ही दुःखद स्थिती आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ज्या रुळांवरून ही वंदे भारत ट्रेन धावतेय, तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. याच झोपडपट्टीतील सर्व कचरा रेल्वे रुळांच्या आजूबाजूने पसरला आहे. त्यामुळे ट्रॅकच्या आजूबाजूला दगड, जमिनीऐवजी फक्त आणि फक्त प्लास्टिक कचऱ्याचा खच दिसून येतोय. नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडे प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसतेय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कचरा फक्त एकाच छोट्याशा जागी पडलेला नाही, तर जोपर्यंत कॅमेरा चालू आहे आणि ट्रेन पुढे धावतेय तिथपर्यंत सगळीकडे कचराच दिसतोय.
दरम्यान, शेकडो युजर्सनी या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त करीत वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. त्यात रेल्वे सेवा (@raliwaySeva) आणि डीआरएम दिल्ली एनआर (@drm_dli)नेही अधिकृत अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर, ‘रेल्वे सेवा’ @RailwaySeva ने DRM दिल्ली NR (@drm_dli) ने उत्तर दिले की, आवश्यक त्या कारवाईसाठी हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले आहे.
त्यानंतर DRM दिल्ली NR यांनी उत्तर दिले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत MCD आणि रेल्वे यांच्यातील परस्पर करारानुसार, MCD ने रेल्वे परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. या भागात झोपडीवासीयांकडून नियमितपणे कचरा टाकला जातो, ज्यामुळे अस्वच्छता निर्माण होते.
दरम्यान, युजर्सदेखील यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ही कचऱ्याची समस्या नाही. ही तिथे राहणाऱ्या झोपडीवासीयांची समस्या आहे. जोपर्यंत त्यांना हटवले जात नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. दुसऱ्याने लिहिले की, एकदा मुंबईत येऊन पाहा… इथे असे काहीही नाही. तर काही युजर्सनी लिहिले की, भावा, या दृश्याचा आनंद घे.