उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे. सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचं प्रमाण वाढलं की, घराबाहेर पाय ठेवणेही कठीण झाले आहे. लोकांना या उकाड्यात प्रवास करण कठीण बनले आहे. तरीही कामानिमित्त लोकांना नाइलाजानं प्रवास करावा लागत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी अनेक लोक एसी कोचनेच प्रवास करण्यास पसंती देत आहेत. परंतु, एसी कोचने प्रवास करूनही तुम्हाला उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही, तर काय कराल? आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात उकाड्यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.
प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या देशातल्या अनेक शहरांना जोडत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन कधी गुरांवर आदळल्याने तर कधी अन्य कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या ट्रेनची अशीच काहीशी चर्चा सुरू झाली आहे. पण, यावेळी समोर आलेली घटना अतिशय धक्कादायी अशी आहे. देशातील या पहिल्या वेगवान ट्रेनमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये लोकांना उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आवश्यक असणारा थंडावा मिळत नाही. खरे तर, या प्रीमियम ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये कोचचा एसी बिघडला तेव्हा प्रवासी कर्मचार्यांशी वाद घालताना दिसतो.
समाजमाध्यम ‘एक्स’ (प्रथम ‘ट्विटर’)वर ‘@gharkekalesh’ नावाच्या हॅण्डलवरून एक व्हिडीओ सामायिक केला गेला आहे. क्लिपमध्ये काही प्रवासी रेल्वे कर्मचार्यांकडे बंद असलेल्या एसीबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात. व्हिडीओमध्ये ट्रेनच्या कर्मचार्यांशी प्रवासी मोठमोठ्याने आरडाओरड करून भांडताना दिसत आहेत. प्रवासी रागाने म्हणतो, “साॅरी म्हणून काय होणार, माझी मुले उष्णतेत बसली आहेत. आता माझ्या रडणाऱ्या मुलांना मी साॅरी म्हणू…”
(हे ही वाचा : Video: बॉयफ्रेंडशी स्टेशनवर भांडण झाल्यानंतर तरुणीने धावत्या रेल्वेसमोर मारली उडी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद )
हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि एक्सवर १.२ लाखाहून अधिक दृश्ये प्राप्त झाली आहेत. नेटिझन्स यावर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी दिली, “अशा उष्णतेमध्ये प्रवाशांना महागडी तिकिटे घ्यावी लागतात आणि ट्रेनने प्रवास करावा लागताे. त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत.”
वास्तविक ही क्लिप 25 मे रोजी x @shudhanshu_ नावाच्या वापरकर्त्याने एक्सवर पोस्ट केली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करीत, त्यांनी लिहिले, “वंदे भारत ट्रेन क्रमांक २२४२२५ मधून मी प्रवास करीत आहे आणि एसी कार्यरत नाही. ही समस्या थ्री एसी कोचमध्ये दिल्लीपासूनच होती, असे माहीत असतानाही या ट्रेनला अयोध्या ते दिल्लीपर्यंत धावण्याची परवानगी देण्यात आली.”
येथे पाहा व्हिडीओ
यावेळी संपूर्ण भारत उष्णतेचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा कोचची वातानुकूलन (एसी) खराब होते तेव्हा प्रवाशांना घाम गाळून आपला प्रवास पूर्ण करावा लागतो. गेल्या शुक्रवार आणि शनिवारी दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आणि एका ‘स्पेशल ट्रेन’मधील एसी खराब झाल्याच्या तक्रारीही उघडकीस आल्या आहेत.