Marathi Ukhana Video: तुळशीच्या लग्नानंतरचे महिने म्हणजे दर दुसऱ्या दिवशी कोणाचा साखरपुडा, लग्न, हळद, काही ना काही कार्यक्रमांची रांगच लागलेली असते. आतापर्यंत कदाचित तुमच्याही नात्यातील- ओळखीतली व्यक्तींच्या समारंभाची आमंत्रण पत्रिका तुमच्याकडेही आली असेल. जवळच्या दूरच्या कोणत्याही कार्यक्रमाची तयारी मात्र सारख्याच उत्साहात करण्याची अनेकांना सवय असते. कपडे, चप्पल, दागदागिने, केसाची स्टाईल, मेकअप या सगळ्या तयारीसह आणखी एक तयारी नीट करून तुम्ही सगळ्या पाहुण्या रावळ्यांमध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाची चांगलीच छाप पाडू शकता. लग्नाचं घर म्हटलं की, प्रत्येक कार्यक्रमात एक आग्रह कायम केला जातो तो म्हणजे उखाणा घ्या. अगदी नव्या नवरीपासून ते सगळ्या विवाहितांना वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या पतीचं नाव घेण्यासाठी आग्रह धरला जातो. अशावेळी अगदी कल्पक पण मजेशीर उखाणा घेतला तर मग तुमची त्या लग्नात किती चर्चा आणि प्रशंसा होणार हे काही नव्याने सांगायला नको. असाच आग्रह पूर्ण करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

@Jaya_Rathod या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या महिलेने यापूर्वी टाकलेल्या एका उखाण्याच्या रीलवर कोणीतरी कमेंट करून तुम्ही नाव घेताना सासु-सासऱ्यांचं नाव सुद्धा जोडलं असतं तर आणखी छान वाटलं असतं असं म्हंटलं होतं, त्याच कमेंटला उत्तर देताना या ताईने फक्त सासू- सासरे नव्हे तर घरातल्या सगळ्यांचं नाव अगदी खास पद्धतीने एकाच उखाण्यात गुंफून घेतलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सासरच्या मंडळींची नावं अशाच प्रकारे यामध्ये बदलून येत्या लग्न समारंभात सगळ्यांचं कौतुक मिळवू शकता, चला पाहूया..

हे ही वाचा<< ८ महिने अंतराळात हरवलेले ‘ते’ दोघे सापडले; तिथे पोहोचलेच कसे? नासाने शेअर केला Video, दृश्य पाहून व्हाल थक्क

दरम्यान, हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासूनच नेटकऱ्यांच्या खूप पसंतीला उतरला होता, अजूनही यावर हजारो लाईक्स व कमेंट्स वाढत आहेत. काहींनी गमतीत बापरे पुन्हा कधी कोणी आग्रहच करणार नाही असे म्हटले आहे तर काहींनी या ताईचं खूपच कौतुक केलं आहे. असे लहान लहान क्षणच एखाद्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर अनेकांनी दिली आहे. तुम्हाला हा उखाणा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.