Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं खरं स्पिरिट पाहायला मिळतं. भांडण, वाद, ते भजन- गाणी गाण्यापर्यंत सगळं काही लोकलच्या डब्ब्यात पाहायला मिळतं. ट्रेनमधली भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. त्यासाठीचे मुद्दे पण कॉमन असतात, चौथ्या सीटवर बसायची भांडणे, दारात उभं राहण्यावरून वाद. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा असाच एक प्रकार पाहायला मिळत आहे. पण यात प्रवाशांचा आक्रमकपणा शाब्दिक वादावरून चक्क मारहाणीपर्यंत कधी पोहोचला हे बघायला सुद्धा वेळ मिळत आहे. दारात उभं राहण्यावरून एका प्रवाशाला ट्रेनमधून चक्क खाली खेचून लाथा- बुक्क्यांनी मारलेलं आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. सीएसएमटीवरुन कर्जतला जाणारी लोकल ट्रेन साधारण ७.१०च्या सुमारास दिवा स्थानकात दाखल झाली. कर्जत लोकल असल्याने या गाडीत नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. अशातच दिव्याला दारात उभा राहिलेल्या एका तरुणामुळे दरवाजा अडवला गेला होता. यामुळे दिव्याला ट्रेनमध्ये चढू इच्छिणाऱ्या प्रवाशांना ट्रेन पकडताच येत नव्हती. वर हा तरुण दरवाज्यात उभा राहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांवर दादागिरी करत होता. यामुळे आणखी भडकून सर्व प्रवाशांनी त्याला खाली खेचले व मग अक्षरशः लाथा- बुक्क्याने खूप मारहाण केली.

Video: मुंबई लोकलमध्ये भयंकर हाणामारी

@RoadsOfMumbai या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांश लोकांनी या मारहाणीवर टीका केली आहे. पण विशेष म्हणजे आपण मारहाण करणाऱ्यांचा राग कितीही चूक ठरवला तरी मुद्दा चुकीचा नाही. दारात उभे राहून इतरांची अडवणूक करणाऱ्या प्रवाशांमुळे चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या दोन्ही प्रवाशांना खूप त्रास सामना करावा लागतो.