सध्याच्या भयानक वेगाने प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात सतत होत असतो. स्मार्टफोनवरच आता आपण घरबसल्या बाजारहाट, खरेदी आणि बँकेची कामे करू शकतो. कुणालाही काहीही आणि कुठेही पैसे पाठवू शकतो. अशा आधुनिक तंत्रज्ञाचा उपयोग केवळ श्रीमंत किंवा सामान्य व्यक्तीलाच नाही, तर रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांनादेखील होत आहे.
असे म्हणण्यामागे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ कारण आहे. एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमावरून शेअर झालेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक अंध भिकारी भीक मागण्यासाठी चक्क क्यूआर कोडचा वापर करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहू.
हा व्हिडीओ एका चारचाकी गाडीमधून शूट झाला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती गाडीच्या दिशेने येत असल्याचे आपण पाहू शकतो. तो माणूस जवळ आल्यावर लक्षात येते की तो एक भिकारी आहे. इतकेच नाही, तर तो एक अंध भिकारी आहे. त्या भिकाऱ्याने आपल्या गळ्यामध्ये एक क्यूआर कोड असलेला बोर्ड लटकवलेला दिसतो.
गाडीमध्ये बसलेली व्यक्ती आणि भिकारी यांमध्ये काहीतरी बोलणे होते; मात्र ते वेगळ्या भाषेत असल्याने ते नेमके काय बोलत आहेत हे समजत नाही. परंतु, व्हिडीओमध्ये दिसणारी गाडीत बसलेली व्यक्ती आपल्या फोनच्या मदतीने भिकाऱ्याच्या गळ्यातील कोड स्कॅन करून, त्यावर १० रुपये पाठवतेय, असे आपल्याला दिसते. मात्र, आपल्याला खरंच पैसे पाठवले आहेत का याची खात्री करण्यासाठी भिकारीदेखील आपल्या खिशातील फोन काढून कानाजवळ नेतो आणि त्यावर १० रुपये आल्याचा मेसेज ऐकून खात्री करून घेतो. असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हा व्हिडीओ गुवाहाटीमधील असल्याचे व्हिडीओमध्ये लिहिलेल्या मजकुरावरून समजते. मात्र, या प्रगत अंध भिकाऱ्याच्या व्हिडीओ कुणी शेअर केला आहे?
हेही वाचा : Video : चोरांकडेही क्रिएटिव्हिटीची कमी नाही! पाहा, बेकरी लुटण्याआधी केलेले हे ‘प्रकार’….
तर काँग्रेस लीडर गौरव सोमाणी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासह व्हिडीओला “विचार करायला लावणारी गोष्ट!” अशी कॅप्शन दिली असून, अजून काय लिहिले आहे पाहा. “#गुवाहाटीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आज एक उल्लेखनीय दृश्य पाहायला मिळाले. एक भिकारी चक्क ‘फोन पे’चा वापर करून लोकांकडून भीक मागत आहे. त्यासाठी या डिजिटल व्यवहाराचा वापर तो करीत आहे. खरंच तंत्रज्ञानाला कोणतीही सीमा नाही. सामाजिक किंवा आर्थिक कोणतेही अंतर तंत्रज्ञान पार करू शकते आणि हे त्याचेच एक उदाहरण आहे. हा क्षण खरेच विचार करायला लावणारा असून, करुणा आणि नवनिर्मितीच्या विकसित होत असलेल्या लॅण्डस्केपबद्दल भाष्य करणारा आहे. याच जोरावर मानवता आणि डिजिटल प्रगतीला छेद देण्यावर विचार करू,” असे व्हिडीओखाली लिहिले आहे.
हा व्हिडीओ २४ मार्च २०२४ रोजी गौरव सोमाणी यांच्या @somanigaurav या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर झालेला आहे. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.