साखरेच्या पाकात घोळवलेली, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असणारी जिलबी न आवडणारी, क्वचितच एखादी व्यक्ती सापडेल. थंड वातावरणामध्ये अशी गरमागरम आणि तोंडात विरघळणारी जिलबी खाणं म्हणजे निव्वळ सुख असते, असे म्हणायला हरकत नाही. आपल्या हातात मावतील अशा साधारण लहान आकाराच्या जिलब्या आपण मिठाईच्या दुकानात बघत असतो. मात्र, बांगलादेशमध्ये मिळणारी ही जिलबी एवढी मोठी आहे की, एकट्या व्यक्तीला ती संपेल की नाही असा प्रश्न हा व्हिडीओ बघून तुम्हाला वाटेल.

या महाप्रचंड जिलबीचे नाव ‘सूर्यफूल जिलबी’ असे आहे. या जिलबीचा आकार साधारण एका मोठ्या पराठ्याइतका असल्याचा आपल्याला दिसतो. आता इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @indian.foodie.boy या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला असून, आता ही सूर्यफूल जिलबी नेमकी तयार कशी होते?

तर या व्हिडीओत दाखवल्यानुसार, सगळ्यात पहिले विक्रेता प्रचंड मोठ्या आकाराची जिलबी हातात घेताना दिसतो आणि त्यानंतर ही जिलबी कशी तयार होते हे पाहायला मिळते. यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर एका स्टुलावर बसून, नेहमीचे पीठ घेऊन जिलबी करण्यास सुरुवात करतो. पीठ कढईत गोलगोल सोडून याचा आकार कढईभर केला जातो. नंतर त्यावर रेषा मारून फुलासारखा आकार केल्यासारखा पाहायला मिळतो. ही जिलबी व्यवस्थित तळून घेऊन मग साखरेच्या पाकामध्ये घोळवली आहे. म्हणजे, आपण जी नेहमी लहान आकाराची जिलबी खातो, त्याचप्रमाणे हा पदार्थ असून केवळ त्याच्या आकारात फरक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा : बापरे! जगातील सर्वांत मोठे सँडविच जवळपास १९० किलोचे! पाहा थेट गिनीज बुकात झाली नोंद….

या व्हायरल झालेल्या व्हिडीओला साधारण एक मिलियन व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

यामध्ये काहींनी, “अप्रतिम”, “बाकी स्वच्छता सोडल्यास फारच सुंदर आहे” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असून, बऱ्याचजणांनी स्वच्छतेवरून प्रतिक्रिया दिल्याचे समजते. त्यामध्ये एकाने, “जेव्हापण मी असे व्हिडीओ पाहतो, तेव्हा एकाच गोष्टीची कमतरता दिसते, ती म्हणजे स्वच्छता”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने, “हायजिनने राम राम ठोकलाय”, अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने “अरे वा, जिलबीला खालच्या बाजूने वेल्डिंगसुद्धा केलं आहे”, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी चौथ्याने “बापरे, नुसता हा व्हिडीओ बघून डायबिटीसची भीती वाटली” अशीदेखील कमेंट केलेली पाहायला मिळते.