सोशल मीडियावर सध्या एका जमावाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नालिजमच्या समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये एक जमाव, पगडी घातलेल्या एका माणसाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मात्र, मारहाण केली जाणारी व्यक्ती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान असल्याचा दावा करत वापरकर्ते हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मात्र, तपासादरम्यान असे आढळून आले की, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही भगवंत मान नसून व्हायरल होणारा दावा हा खोटा आहे. नेमके काय व्हायरल होत आहे आणि व्हिडीओमागे सत्य काय आहे ते पाहू.
काय होत आहे व्हायरल?
एक्स [पूर्वीचे ट्विटर] वापरकर्ता @AyodhyaPrasadN3 ने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.
या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन पाहा.
इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
तपास करताना आम्ही व्हिडीओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून आमचा तपास सुरू केला. त्यामध्ये की फ्रेमवरील एका शोधामुळे आम्हाला १३ एप्रिल रोजीची जेके रोजाना न्यूजची फेसबुक पोस्ट निदर्शनास आली.
शेअर केलेला व्हिडीओ युवा जाट सभेच्या रॅलीचा असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘अमनदीप सिंग बोपाराय’ पेज असाही उल्लेख आहे.
त्यानंतर आम्ही अमनदीप सिंग बोपाराय यांच्या फेसबुक पेजचा तपास घेतला.
तपास करताना आम्हाला एक व्हिडीओ सापडला, ज्यामध्ये अमनदीप सिंग बोपराय पत्रकार परिषदेदरम्यान बोलत असून, यात त्यांनी १३ एप्रिलच्या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
आम्हाला अजून एक व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये ते हल्ल्याबद्दल बोलत होते.
याबद्दल माहिती देताना त्यांनी ५० हून अधिक लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली.
त्यानंतर आम्ही यूट्यूबवर कीवर्ड शोधले आणि चॅनेल 1 वर एक व्हिडीओ सापडला, ज्यामध्ये युवा जाट सभा रॅलीमध्ये काय घडले हे स्पष्ट करण्यात आले आहे.
इतकेच नाही तर पंजाब केसरीच्या वेबसाइटवर कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला अजून एक व्हिडीओदेखील सापडला.
‘मला मार्च महिन्यातच आपल्यावर हल्ला केला जाईल अशी धमकी देण्यात आली होती’, असे अमनदीप सिंग बोपाराय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते.
निष्कर्ष:
या सर्व तपासावरून असे लक्षात येते की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचा दावा करत जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते दावे खोटे आहेत आणि व्हायरल होणारा व्हिडीओ हा अमनदीप सिंग बोपाराय यांच्यावरील हल्ल्याचा जुना व्हिडीओ आहे, असे स्पष्ट होते.