कुत्रा इतर मुक्या प्राण्यांच्या तुलनेत खूप इमानदार प्राणी असल्याचे म्हटले जाते. कारण- तो आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करतो. सोशल मीडियावर या पाळीव प्राण्याच्या इमानदारीच्या विविध घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी तो मालकाचा जीव वाचवण्यासाठी धडपड करतो; तर कधी तो मालक सांगेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत असतो. सध्या अशाच एका इमानदार कुत्र्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेक जण त्याचे मनापासून कौतुक करीत आहेत; शिवाय त्याच्या इमानदारीची आणि मालकावर असणाऱ्या प्रेमाची खूप चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कन्नूर जिल्हा रुग्णालयात चार महिन्यांपासून एक कुत्रा आपल्या मालकाची वाट पाहत उभा आहे. हा कुत्रा रुग्णालयाच्या शवागाराबाहेर आपला मालक बाहेर येतोय का याची वाट पाहत आहे. परंतु, या कुत्र्याला आता त्याचा मालक कधीच बाहेर येणार नाही याची कल्पनाही नाहीये. कारण- त्याच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. तरीही आपला मालक आज ना उद्या रुग्णालयातून बाहेर येईल या आशेने तो आजही रुग्णालयाबाहेर तिथेच घुटमळत आहे. कारण- आपला मालक मरण पावला आहे हे त्या मुक्या प्राण्याला माहीत नाही.

हेही पाहा- VIDEO : दारुच्या नशेत सापाशी बोलत होता दारुडा; क्षणात झालं असं काही की गमवावा लागला जीव

याचं कारण म्हणजे कुत्र्याच्या मालकाचा मृतदेह रुग्णालयातील शवागारात एका दरवाजातून आत आणला गेला होता; तर दुसऱ्या बाजूनं तो बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे कुत्र्याला अजूनही मालक शवागारातच असल्याचं वाटत आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. जवळपास तीन ते चार महिन्यांपूर्वी शवागाराच्या बाहेर एक कुत्रा बसलेला असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला कुत्रा घरातून बेपत्ता झाला असावा, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुत्र्याची काळजी घेत त्याला खायला द्यायला सुरुवात केली; शिवाय कर्मचाऱ्यांनी कुत्र्याचं नाव ‘रामू’, असं ठेवल्याचंही तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, “काही महिन्यांपूर्वी कुत्रा त्याच्या मालकासह आला होता. रुग्णालयात दाखल केलेल्या या मालकाचा मृत्यू झाला आणि मग त्याचा मृतदेह शवागारात हलवण्यात आला होता. तेव्हापासून रामू त्याच्या मालकाची वाट पाहत आहे; शिवाय त्याला आशा आहे की, एक ना एक दिवस त्याचा मालक शवागाराच्या दारातून बाहेर येईल. पण, दुर्दैवानं तसं होणार नाही.” सध्या या कुत्र्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तो रुग्णालयाबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय या घटनेची ते Hachi : A Dog’s Tale या हॉलीवूड चित्रपटाशी तुलना करीत आहेत; ज्यामध्ये कुत्रा मालकाची वाट पाहत असतो. शिवाय ही घटना खूप हृदयस्पर्शी असल्याचेही काही नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून डोळे पाणावले असल्याचंही म्हटलं आहे.