सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दारुच्या नशेत सापाशी मस्ती करताना दिसत आहे. शिवाय यावेळी जो ज्या सापाबरोबर मस्ती करत व्हिडीओ बनवत आहे, तोच साप चावल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात घडली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी दारुच्या नशेत नको ते स्टंट करणं जीवघेणं ठरु शकतं असं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत सापाबरोबर मस्ती करणाऱ्या तरुणाचं नाव रोहित जायसवाल असं आहे. २२ वर्षीय रोहित खुखुंदू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहिरौली गावचा रहिवासी होता. ही घटना मागील शनिवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. रोहित दारुच्या नशेत असाताना त्याला जवळून जाणारा एक साप दिसला, यावेळी तो सापाच्या जवळ गेला आणि त्याच्याशी मस्ती करु लागला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित एका हातात सिगारेट धरून सापाला मुद्दाम त्रास देत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सापाला थोडा वेळ जमिनीवर खेळवल्यानंतर तो सापाला चक्क गळ्यात घालतो. शिवाय दारुच्या नशेत तो सापाशी बोलत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- प्रियकराचा लग्नाला नकार प्रेयसीने जिवंतपणी केले स्वत:चे अंत्यसंस्कार, अनोखा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

व्हिडीओत, रोहित सापाला चावण्याचे आव्हान देत आहे. यावेळी तो सापाला शिव्या देत असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याचा आवाज बंद केला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो सापाशी बोलल्याचं ऐकू येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रोहित सापाला हाताने मारताना सिगारेट ओढतो. याच दरम्यान गळ्यातील साप अचानक त्याच्या मानेला चावतो ज्यामुळे रोहितचा जागीच मृत्यू होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तिथे उपस्थित एका व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आले आणि त्यांनी रोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तर रोहितचे आई-वडील पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे काम करतात आणि त्याचे इतर भाऊही बाहेरच्या शहरात काम करतात अशी माहीती समोर आली आहे. रोहितला ६ भावंडे असून तो घरातील सर्वात लहान मुलगा होता. तर दारुच्या नशेत नको ते कृत्य करणं जिवावर कसं बेतू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ असल्याच्या कमेंट नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.