कडाक्याची थंडी असो किंवा घामाच्या धारा लावणारा उन्हाळा, चहाप्रेमींना उठल्याउठल्या कपभर चहा हा लागतोच. वातावरणानुसार चहामध्ये आपण विविध घटक वाढवत किंवा कमी जास्त करत असतो. म्हणजे, पावसाळा असेल तर आलं, गवतीचहा अशा गोष्टी घातल्या जातात. उन्हाळा असल्यास वेलची आणि चहा मसाला; तर हिवाळ्यामध्ये घशाला आराम देण्यासाठी, शरीराला उब मिळण्यासाठी आले, दालचिनी, वेलची, लवंग असे कितीतरी विविध जिन्नस त्या एका चहासाठी चहाप्रेमी घालत असतात.

त्याचप्रमाणे बिर्याणीवर भरभरून प्रेम करणारीदेखील अनेक मंडळी आहेत. कुणाचा वाढदिवस असो, घरगुती कार्यक्रम असो किंवा कोणतीही पार्टी असो, त्यामध्ये हमखास बिर्याणीचा बेत ठेवणारे आपल्याला सापडतील. खरंतर चहा आणि बिर्याणी आपल्या संपूर्ण देशात कुणाला आवडत नाही असे क्वचितच सापडतील. पण, या दोन पदार्थांवर इतकी चर्चा का होत आहे? असे वाटत असेल तर त्याचे कारण आहे, सोशल मीडियावर शेअर होणारा ‘बिर्याणी चहा.’

हेही वाचा : सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बिर्याणी-मॅगी रेसिपी; पदार्थ पाहून नेटकरी म्हणाले, “अरे देवा तो….

होय. सोशल मीडियावर सध्या @nehadeepakshah या इन्स्टाग्राम अकाउंटने या भन्नाट पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. आता अगदी नावाप्रमाणे यामध्ये काही भात, कांदा, तिखट किंवा मिरच्यांसारखे पदार्थ [नशिबाने] घातलेले नाहीत. मात्र, बिर्याणी तयार करताना वापरले जाणारे मसाले वापरून हा कोरा चहा बनवल्याचे व्हिडीओमध्ये पाहू शकतो. नेहाच्या म्हणण्याप्रमाणे, “हा बिर्याणी चहा दुबईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असून, त्याचा आस्वाद घेण्यासाठी लोकं रात्री २ वाजेपर्यंत दुकानाबाहेर रांगा लावतात. तसेच या चहामध्ये बिर्याणीचे खडे मसाले घातल्याने याला बिर्याणी चहा असे नाव पडलेले असू शकते”, असे समजते.

एवढं सगळं ऐकून आता हा बिर्याणी चहा कसा तयार केला जातो, याबद्दल जर तुम्हाला उत्सुकता किंवा प्रश्न पडला असेल तर खाली दिलेली रेसिपी पाहा.

अर्धा लिटर पाणी, २ इंच दालचिनी, १ चक्र फुल, ७ ते ८ काळी मिरी, ३ ते ४ वेलची, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा चहा पावडर, मोठा आल्याचा तुकडा, २ चमचे मध, लिंबाचा रस, ४ ते ५ पुदिन्याची पाने असे साहित्य लागणार आहे.

सगळ्यात पहिले एका भांड्यात पाणी उकळून त्यामध्ये सर्व मसाले घाला. मसाले उकळल्यानंतर, त्यामध्ये चहा पावडर घालून काही मिनिटे सर्व पदार्थ उकळून घेऊन पातेल्याखालील गॅस बंद करा. आता आल्याचे तुकडे घेऊन त्यांना व्यवस्थित कुटून घ्या आणि ग्लास किंवा कपमध्ये घाला. त्यामध्ये मध, लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने घालून तयार केलेला चहा गाळून घ्या. तयार गरमागरम आहे बिर्याणी चहा.

हेही वाचा : Viral video : पोटावर एक मुलगी अन् खांद्यावर लहान मुलाला घेऊन पठ्ठ्याने ‘पाठीवर’ मारल्या दोरीच्या उड्या; नेटकरी म्हणाले…”

ही रेसिपी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. मात्र, नेटकऱ्यांनी याला फारशी पसंती दिली नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून समजते.

“याला चहा नका म्हणू हा काढा आहे.” एकाने लिहिले, “मॉकटेल चहा असे नाव दिले तरी चालेल, पण बिर्याणी चहा नको”, असे दुसऱ्याने लिहिले. “मी १० वर्षांपासून दुबईमध्ये राहतोय, पण एकदाही या पदार्थाचे नाव ऐकले नाही”, असे तिसऱ्याने लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@nehadeepakshah या अकाउंटवरून शेअर झालेल्या या बिर्याणी चहाच्या व्हिडीओला आतापर्यंत ३.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.