Burhanpur Gold Coins Search: बुरहाणपूरच्या असीरगड येथे एक अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील गावकरी डोक्याला टॉर्चवाले हेल्मेट, मोबाइलचा टॉर्च सुरू करून रात्रीच्या अंधारात माती चाळताना दिसत आहेत. असीरगड येथील गावात शेतात सोन्याची नाणी आढळल्याची अफवा पसरल्यानंतर ही नाणी शोधण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच बुरहाणपूर हे औरंगजेबाचे प्रिय शहर असल्याचे कळले. या शहरात त्याचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. चित्रपटातील हा प्रसंग आणि असीरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला.

असीरगड येथे महामार्गाची उभारणी करण्यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात खोदकाम झाले आहे. काही दिवसांपूर्वी मजूरांनी याठिकाणी मातीत सोन्याचे शिक्के मिळाल्याचे सांगितले. यानंतर असीरगडच्या गावाता अफवा पसरली की, याठिकाणी औरंगजेबाचा खजाना पुरलेला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांतूनही ग्रामस्थ याठिकाणी धडकले आणि त्यांनी चाळणीने माती चाळायला सुरूवात केली. रात्रंदिवस याठिकाणी लोक माती चाळण्याचे काम करत आहेत. यापैकीच एक रात्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ बुरहाणपूरचाच आहे का? याबाबत सरकारी पातळीवरून खात्री पटविण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गावकऱ्यांनी टॉर्च असलेल्या टोप्या, मेटल डिटेक्टर असे साहित्य जमवून सोन्याची नाणी शोधण्याचा चंग बांधलेला दिसतो.

व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी महामार्गालगत खड्डे खणणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. अनधिकृतपणे खोदकाम केल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

बुरहाणपूरमध्ये मुघलांची छावणी

मध्य प्रदेशच्या बुरहाणपूर येथे कधी काळी मुघलांची छावणी होती. मध्य प्रदेश भारताच्या मधोमध असल्यामुळे मुघल सैनिक लढाई नंतर याठिकाणी जमत आणि लुटून आणलेला खजिना येथेच ठेवत असत, असे सांगितले जाते. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार याठिकाणी पूर्वीही काही जणांना सोन्याची नाणी सापडल्याचे सांगितले जाते. मात्र छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खजिना शोधण्याची उर्मी नव्याने जागृत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छावा चित्रपटात काय दाखवले?

छावा चित्रपटाची सुरुवातच बुरहाणपूरच्या लढाईपासून होते. बुरहाणपूरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या खजिन्याचे भंडार असल्याचे चित्रपटात दाखवले गेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैनिकांसह बुरहाणपूरवर आक्रमण करून येथील खजिना आपल्यासह नेला होता.