आजच्या सोशल मीडियाच्या युगात लोकप्रियतेसाठी अनेक जण कोणत्याही गोष्टीला तयार असतात. रेल्वे ट्रॅक, स्टेशन किंवा चालत्या गाड्यांच्या जवळ रील्स बनवणे ही धोकादायक सवय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून लोक म्हणत आहेत – “लोको पायलटनं जे केलं, ते अगदी बरोबर केलं!” हा व्हिडीओ एका रेल्वेस्थानकावरील तरुणाचा आहे. तो प्लॅटफॉर्मवर उभा राहून टशन दाखवीत मोबाईलवर रील बनवत असतो. त्याच्यामागून ट्रेन वेगाने येत असते; पण त्याला त्याची काहीच पर्वा नसते. सोशल मीडियावर अशा धोकादायक रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याची ही आजच्या तरुणांची नवी सवय बनली आहे.
या व्हिडीओमध्ये दिसतं की, ट्रेन हळूहळू जवळ येत असते आणि तो तरुण अजूनही कॅमेऱ्यासमोर उभा राहून टशन दाखवीत असतो. ट्रेन अगदी काही फुटांवर येते, तेवढ्यात लोको पायलट इंजिनाच्या खिडकीतून हात बाहेर काढतो आणि त्याच्या हातात असलेल्या झेंड्याने त्या तरुणाच्या डोक्यावर हलकासा फटका मारतो. अचानक बसलेल्या त्या झटक्यामुळे तो तरुण दचकल्यासारखा मागे सरकतो. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव लगेचच बदलतो आणि त्याला जाणवतं की, तो क्षणभरापूर्वी किती मोठ्या संकटात सापडला होता.
पाहा व्हिडिओ
त्या एका क्षणात त्याला समजतं की, रील बनवताना तो फक्त प्रसिद्धीच्या मागे लागला होता पण स्वतःचा जीव धोक्यात घालत होता. जर लोको पायलटने वेळेवर प्रतिक्रिया दिली नसती तर मोठा अपघात होऊ शकला असता. हा प्रकार पाहताना व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो. अनेकांना असं वाटतं की, इतकं धाडस करुन थोड्या वेळाच्या प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळणं किती मूर्खपणाचं आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकताच काही क्षणांतच खूप व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो पाहिला आणि लोको पायलटचं कौतुक केलं. अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, पायलटनं खूप शहाणपणानंच काम केल . एका युजरने लिहिले – “लोको पायलटनं एकदम बरोबर केलं. अशांना धडा मिळायला हवा.” दुसऱ्याने मजेत म्हटले – “हा झेंडा नव्हता, तर आयुष्याची शिकवण होती.” काहींनी हा व्हिडीओ जागरूकतेचा संदेश देणारा असल्याचे सांगत शेअर केला; तर काहींनी विनोदाने लिहिले– “लोको पायलटनं एक झटका दिला आणि त्या मुलाला सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा मोह थांबवला!” या व्हिडीओवरून सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली – अशा धोकादायक रील्स करून प्रसिद्ध होण्यापेक्षा सुरक्षित राहणं जास्त महत्त्वाचं आहे.
रेल्वे प्रशासनाने वारंवार अशा रील्स बनवण्याविरोधात इशारा दिला आहे. ट्रॅकजवळ किंवा चालत्या गाड्यांच्या आसपास व्हिडीओ शूट करणे हे नियमबाह्य आणि दंडनीय आहे. हा व्हिडीओ म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर त्यामुळे एक गंभीर संदेशही मिळतो – “सोशल मीडियाच्या मोहात स्वतःचा जीव धोक्यात घालणं कधीही योग्य नाही.
