Heart Attack During Garba: नवरात्र उत्सव म्हणजे आनंद, भक्ती व नृत्याचा संगम. संपूर्ण देशात या दिवसांत देवीच्या आराधनेसोबतच गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. रंगीबेरंगी पोशाख, ढोल-ताशांचा आवाज आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण प्रत्येक ठिकाणी दिसते. परंतु मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नवरात्रातील गरबा कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. आनंदाने नाचणाऱ्या एका नववधूचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
खरगोन जिल्ह्यातील भिकनगाव तालुक्यातील पलासी गावात रविवारी रात्री दुर्गा मंदिरात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. येथे १९ वर्षीय सोनम नावाची नवविवाहित तरुणी आपल्या पतीसोबत गरब्यात सहभागी झाली होती. चार महिन्यांपूर्वी म्हणजे मे महिन्यातच तिचा विवाह कृष्णपाल या तरुणाशी झाला होता. नवरा–बायको मिळून देवीच्या मूर्तीसमोर गरबा सादर करीत होते.
‘ओ मेरे ढोलना’ या गाण्यावर नाचत असताना अचानक सोनम जमिनीवर कोसळली. सुरुवातीला पाहणाऱ्यांना वाटले की, तिचे पडणे हा नृत्याचा भाग आहे. काही जण तर पण काही क्षणांनंतरही ती उठली नसल्याचे लक्षात आले आणि त्यामुळे कुजबुज होत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
पाहा व्हिडिओ
कृष्णपाल म्हणजेच तिचा पती घाईघाईने तिला उठवू लागला; मात्र ती हलत नव्हती. नंतर इतरांनीही मदत केली; परंतु तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांकडे नेईपर्यंत सोनमचा श्वास थांबला होता. वैद्यकीय तपासणीत कळले की, तिला हृदयविकाराचा झटका आला होता. विशेष बाब म्हणजे सोनम पूर्णपणे निरोगी होती आणि तिची तब्येत बरी नसल्याची कोणतेही लक्षणे दिसत नव्हती, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयात येऊ शकतो. काही वेळा शरीरात लपलेले आजार बाहेर न येता, अचानक सक्रिय होतात आणि जास्त शारीरिक श्रमांमुळे त्याचे दुष्परिणाम दिसतात. गरब्यासारख्या ऊर्जावान नृत्यातही हृदयावर ताण येऊ शकतो. सध्या आरोग्य विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
चार महिन्यांपूर्वीच संसाराला सुरुवात केलेल्या या नववधूचा असा अचानक झालेला अंत संपूर्ण समाजाला हादरवून गेला आहे. उत्सवाच्या रंगलेल्या वातावरणात झालेला हा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक असून, आनंदाच्या क्षणीही आयुष्य किती अनिश्चित आहे याची जाणीव करून देणारा ठरला आहे.