Viral Video: घरातील कुत्रा, मांजर, म्हैस, बैल हे पाळीव प्राणी आपण जेवढा जीव लावू त्याहून अधिक आपल्यावर माया करतात. आपल्यापेक्षा त्या प्राण्यांचा आपल्यावर जास्त विश्वास असतो. हे प्राणी अनेकदा आपल्या मालकाला त्याच्या संकटात मदत करतात. या लाडक्या प्राण्यांना घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम, माया दिली जाते. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही मालक आणि त्याच्या बैलामधील प्रेम पाहायला मिळेल.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ओल्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांच्या घरातदेखील पाणी शिरले आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात पाण्याने तुडुंब भरलेल्या नदीतून एक बैल त्याच्या मालकाकडे येताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुराच्या पाण्यातून मालक नदीच्या दुसऱ्या काठावर येतो, परंतु यावेळी त्याचा एक बैल पलीकडेच राहतो. बैल पलीकडे राहिलेला पाहून मालक आणि इतर काही मंडळी बैलाला आवाज देऊन बोलावतात. मालकाने बोलावल्याचे पाहून बैल पोहत नदीच्या पाण्यातून वाट काढत) नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचतो. यावेळी मध्येच पाण्याचा वेग वाढल्यावर बैल वाहून तर जाणार नाही ना? अशी शंका मालकाला येते. त्यासाठी मालकदेखील पाण्यात उतरून पुढे जातो. मालक आणि बैलामधील हे प्रेम पाहून नेटकरी खूप कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @swargahun_sundar_aamch_kokan या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाइक्स आणि हजारो व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “म्हणूनच तर याला शेतकऱ्याचा राजा म्हणतात”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मुक्या जनावरांची काय चूक आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “अक्षरशः रडले, या भावना फक्त शेतकऱ्याच्या लेकरांनाच समजतील.”