Viral Video Cab Driver Adjusting Rear View Mirror : घराबाहेर पडताना रात्री उशीर होऊ नये म्हणून घरी परतण्याची घाई, छोटे कपडे घालते म्हणून टोमणे ऐकणे, अनोळखी चालकांबरोबर प्रवास करण्याची भीती आदी अनेक गोष्टी महिला, तरुणी यांना रोज अनुभवायला मिळतात. कधी कधी स्वतःवर बंधन म्हणून नाही, तर वाईट नजरेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बाईला स्वतःच्या जीवनात बदल करावे लागतात. पण, जर इतरांनीच बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यांना आदराने वागवले, तर कदाचित अशी परिस्थिती कधीच उद्भवणार नाही .
यशिका रापारिया या महिला प्रवाशाने कॅबमधून प्रवास करताना नुकताच एक अनुभव शेअर केला आहे. यशिका तिच्या नवजात बाळासह कॅबमध्ये प्रवास करीत होती आणि तिला तिच्या बाळाला स्तनपान करायचे होते. तिच्याकडे स्वतःला झाकण्यासाठी आवश्यक वस्तू होत्या. त्यामुळे तिने बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली. हे बघताच कॅब ड्रायव्हरने परिस्थिती लक्षात घेतली आणि जाणीवपूर्वक त्याचा रिअर व्ह्यु मिरर अशा स्थितीत फिरवला केला की, जिथून त्याला मागची सीट अजिबात दिसणार नाही. कॅब ड्रायव्हरची ती कृती बघून यशिकाला धक्का तर बसलाच; पण तितकाच तिला आनंदही झाला.
या फक्त प्रवासी नसतात; तर एक आई सुद्धा असतात… (Viral Video)
महिलांना कॅब आणि ऑटोमध्ये अस्वस्थ वाटणे ही, नेहमीची गोष्ट झाली आहे. एखादी बाई रिक्षा किंवा कॅबमध्ये बसली की, त्यांच्याकडे बघण्यासाठी काही चालक रिअर व्ह्यु मिररचा गैरवापर करतात. त्यामुळे एखाद्या नवप्रसूत स्त्रीला बाळाबरोबर प्रवास करणे आणि प्रवासात त्याला दूध पाजणे हे तिच्यासाठी एक मोठे आव्हानच ठरते. अशा वेळी या महिला फक्त प्रवासी नसतात, तर त्यांना एका तान्हुल्याच्या मातेचीही भूमिका निभवायची असते. मग अशा प्रसंगी एका अनोळखी व्यक्तीकडून घेतली जाणारी काळजी आणि दिला जाणारा आदर मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. त्या्मुळे यशिकाला या प्रवासातून असा अनुभव मिळाला की, दयाळूपणा आणि आदर छोट्या छोट्या गोष्टी किंवा कृतींमधूनही दिसून येतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ यशिका रापारिया हिने @baby_led_parenting या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आणि “त्यांनी दाखवलेल्या आदराची तुम्ही मनापासून दखल घेतली हे पाहून छान वाटले”, “तू त्यांना टॅग कर. म्हणजे ती ही गोष्ट इतरांनाही शिकवू शकतील” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत. तर तुम्हाला कधी प्रवास करताना असा काही सकारात्मक अनुभव आला आहे का? ते आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा.