Family Secretly Plans Dubai Trip For Mother : सून कुटुंबाला वेगळे करते आणि सासू फक्त भांडणच करते, असाच समज आपल्यातील अनेकांचा असतो. पण, बदलत्या काळात सासू-सुनेचे नाते मैत्रीत बदलले जात आहे. मनमोकळेपणाने बोलणे, एकमेकांना कामात मदत करणे आणि कुटुंबातील सदस्यांना जोडून ठेवणे दोघींना जमले, तर खटके उडणे दूरच, दोघींना कोणी एकमेकांपासून दूरही करणार नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सुनेने सासूला वाढदिवसाचे भन्नाट सरप्राईज दिले आहे.
सून, सासूबाईंना कसे सरप्राईज दिले हे व्हिडीओत दाखवते आहे. सुकेशी मेहता यांची सून, मुलगा व नातू एक महिना भारतात राहिले. त्यादरम्यान सून आणि लेकाने सुकेशी मेहताचे कपडे बॅगेत भरले आणि पासपोर्टदेखील चोरून स्वतःजवळ ठेवला. त्यानंतर तिघेही अमेरिकेला परत जाणार, असे सांगून सासूला एअरपोर्टला सोडायला चल, असे म्हणाले. सासू एअरपोर्टला सोडायला आली. पण, व्हिडीओमध्ये सुकेशी मेहताला तिचा मुलगा, सून, नातवंडांकडून खास सरप्राईज मिळाले.
तिला या सरप्राईजची अपेक्षाही नसेल (Viral Video)
विमानतळावर खोटं, खोटं पाया पडायचे नाटक करून झाल्यानंतर कुटुंब ‘तू आमच्याबरोबर दुबईला येतेय’ असे सुकेशी मेहताला सांगतात. सासूला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. त्यानंतर सून आणि लेक तिला तिकीट आणि पासपोर्ट दाखवतात. आपण दुबईला जातोय हे कळताच सासू थेट बहिणीला फोन करून ही आनंदवार्ता सांगते. त्यानंतर मग दुबईचा प्रवास व्हिडीओत दाखवला जातो. सासू कशा प्रकारे दुबईत फिरते, कोणते कपडे घालते, तिचा वाढदिवस कसा साजरा केला जातो या सगळ्याची झलक व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vspiceroute आणि @sukeshimehta54 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुकेशी मेहताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि “तिला या सरप्राईजची अपेक्षाही नसेल”, “अनेकांना सासूला त्यांच्या सहलीला घेऊन जायला आवडत नाही. पण, इथे फक्त मुलाने नाही तर सूनेने देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. हे उत्तम पालकत्वाचे लक्षण आहे”, “त्यांची प्रतिक्रिया खूपच छान. जर सून चांगली आणि आधार देणारी असेल, तरच हे शक्य आहे”, “सून असावी तर अशी” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.