Viral video: कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसतो, तर तो घरचा सदस्य, मित्र व रक्षणकर्ता असतो. माणूस दुःखी असो वा आनंदी कुत्रा नेहमी त्याच्या जवळ असतो. त्याचं प्रेम निरपेक्ष असतं, त्यात स्वार्थ नसतो. म्हणूनच असं म्हटलं जातं, “कुत्रा हा माणसाचा सगळ्यात विश्वासू साथीदार आहे.” सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका पाळीव कुत्र्यानं आपल्या मालकिणीचा जीव वाचवून, या नात्याची ताकद सगळ्यांना दाखवून दिली आहे.

सोशल मीडियावर सध्या हा हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, पाळीव प्राण्यांची निष्ठा आणि त्यांचा समजूतदारपणा अतुलनीय असतो. आपण अनेकदा ऐकतो की, कुत्र्यांना ‘सहावं इंद्रिय’ असतं, जे काहीतरी वाईट घडणार असताना जागृत होतं आणि हा व्हिडीओ त्याचं जिवंत उदाहरण आहे. एका कुत्र्यानं त्याच्या मालकाचा जीव थोडक्यात वाचवला आणि प्रेक्षक हे दृश्य पाहून भावूक झाले.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह कॅफेबाहेर पदपथावर बसलेली दिसते. दोघेही शांत वातावरणात वेळ घालवत असताना, काही क्षणांतच सर्व काही बदलतं. अचानक कुत्र्याला काहीतरी वाईट घडणार आहे, असं जाणवतं.

ती महिला खुर्चीवर बसली आहे आणि तिचा पाळीव कुत्रा तिच्या शेजारी बसला आहे. काही सेकंदांनंतर, कुत्रा अचानक उठतो आणि मालकिणीच्या खुर्चीला जोरात ढकलून, तिला बाजूला ढकलतो. त्याच क्षणी एक कार खूप वेगात येते आणि नेमक्या त्याच ठिकाणी भिंतीवर आदळते, जिथे काही सेकंदांपूर्वी महिला बसलेली होती! हे दृश्य इतकं अचानक घडतं की, व्हिडीओ पाहणारे काही क्षण स्तब्ध होतात. यातून हे स्पष्ट होतेय की, जर कुत्रा काही सेकंद उशिरा आला असता, तर ती महिला वाचली नसती.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर कुत्र्याच्या या धाडसाचं आणि सतर्कतेचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत आणि लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्यानं लिहिलं, “हे खरोखर घडतं! कुत्र्यांना काही सेकंद आधीच अज्ञात धोका जाणवतो.” दुसऱ्या एका युजरनं विनोदी पद्धतीनं लिहिलं, “यमराज मॅडमला घ्यायला आला होता; पण कुत्र्यानं त्याला आधी पाहिलं आणि त्याला हाकलून लावलं.” तर आणखी एकानं म्हटलं, “आजच्या काळात खरे-खोटे व्हिडीओ ओळखणं कठीण झालंय; पण हा व्हिडीओ मनाला भिडतो.”

काही जणांनी हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचंही म्हटलं; पण बहुतेकांनी कुत्र्याच्या समजुतीचं कौतुक केले. सत्य काहीही असो, या क्लिपनं पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित केली आहे की, पाळीव प्राणी फक्त सोबती नाहीत, तर ते कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्या मालकांसाठी त्यांचं जीवन धोक्यात घालण्यास ते नेहमीच तयार असतात.