Viral Video Family’s First Bicycle At Home : घरातली पहिली गाडी मग ती सायकल असो किंवा कोणती महागडी गाडी; प्रत्येकासाठी पैसे हे द्यावेच लागतात आणि ही वस्तू विकत घेण्यासाठी घरातील एक व्यक्ती दिवसरात्र मेहनत घेत असते. त्यामुळे पहिल्यांदा एखादे वाहन आपल्या घरात आल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये मेहनतीने पहिली सायकल घेतल्याचा आनंद काय असतो हे आई सांगताना दिसते आहे.
आई-बाबांनी लेकीसाठी सायकल खरेदी केलेली असते. सायकल घरी घेऊन येताना उशीर झाला आणि लेक दीपिका रात्री लवकर झोपून गेली. त्यामुळे मग आईने सकाळी सायकलची पूजा करण्याचे ठरवले. पण, पूजा करताना तिने लाखमोलाचा संदेश सगळ्यांना दिला आहे. “मोठा आनंद माणसांना घमंडी आणि हट्टी बनवतो. पण, छोट्या आनंदात खरं सुख असतं” ; असे ती व्हिडीओत सांगताना दिसते आहे.
ईएमआयचे ओझे नाही फक्त आनंदाचे क्षण (Viral Video)
असे म्हणतात की, सुखाची वाट अनपेक्षित असते. ती कधी कोणत्या गोष्टीतून आपल्या समोर येईल काही सांगता येत नाही. पण, आपण त्या सुखाकडे पाठ फिरवून भलतंच काहीतरी शोधत बसतो; त्यामागे धावण्यात आयुष्याचे सुख हरवून बसतो. पण, व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई मोलाचा संदेश देत लेकीबरोबर अगरबत्ती ओवाळून नवीन सायकल घरात आल्याच्या आनंदात सायकलची पूजा करताना दिसत आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @love.connection_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जर सायकल मेहनतीने कमवली असेल तर ती एखाद्या महागड्या गाडीपेक्षा कमी नाही” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “ईएमआयचे ओझे नाही फक्त आनंदाचे क्षण”, “माझी पहिली सायकल मिळाली तेव्हा मला झालेला आनंद अजूनही मला आठवतो आहे”, “कठोर परिश्रमातून मिळालेल्या गोष्टीतून मला आनंद मिळतो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.