आपल्या देशाला ‘भारत’ असे म्हणतात. हे नाव ‘भरत’ राजावरून पडले आहे. भरत हा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र, याचा उल्लेख महाभारताच्या आदी पर्वात आला आहे. पण, जगभरामध्ये भारत देश हा ‘इंडिया’ नावाने ओळखला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की भारताला इंडिया हे नाव कसे पडले? इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंडस व्हॅली, अर्थात सिंधू खोरे या नावावरूनच भारताचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले होते. भारत असो किंवा इंडिया असो….अनेक विदेशी नागरिकांना भारताचे, भारतीय संस्कृतीचे आकर्षण आहे. अनेक लोकांना भारतात फिरायला, राहायला आवडते. येथील विविध धर्मांची संस्कृती जाणून घ्यायला आवडते. अनेकांना येथील खाद्यसंस्कृती आवडते. अनेकांना भारतातील विविध भाषा आवडतात. अनेक विदेशी नागरिकांचे भारत देशावर खूप प्रेम आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओ एका विदेशी महिलेचा आहे, जिने भारत देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अशी गोष्ट केली आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. विदेशी महिलेचे भारत देशावरील प्रेम पाहून भारतीय लोक थक्क झाले आहेत.

विदेशी महिलेनं तिच्या मुलीचं नाव ठेवलं ‘इंडिया’

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एका लहान विदेशी मुलीचे नाव तिच्या आईने ‘इंडिया’ असे ठेवले आहे. परंतु, त्यामागे एक ‘हृदयस्पर्शी’ कारण आहे आणि ते ऐकल्यानंतर भारतीय नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत.

व्हिडीओमध्ये एका लहान विदेशी मुलीला एक व्यक्ती तिचे नाव विचारते. त्यावर ती उत्तर देते की, “माझे नाव इंडिया आहे.” त्यावर ती व्यक्ती सांगते की, ” इंडिया तर आमचा देश आहे, तुझे नाव काय आहे?” त्यावर ती मुलगी सांगते, “माझे नावच इंडिया आहे.” हे ऐकल्यानंतर व्यक्ती थक्क होते आणि तिच्या आईला विचारते की, “तुम्ही तुमच्या मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे?” त्यावर ती महिला हसते आणि उत्तर देते की, “हो, मी तिचे नाव इंडिया ठेवले आहे, कारण हा खूप सुंदर देश आहे; त्यामुळे हे नाव खूप सुंदर आहे. मला हा देश खूप आवडतो.”

हे ऐकून ती व्यक्ती विदेशी महिलेला विचारते की, “तुला हा देश का आवडतो?” त्यावर विदेशी महिला सांगते की, “भारताबद्दल सर्व काही आवडते, तेजस्वी रंगांपासून, समृद्ध सुंगधांपासून ते तेजस्वी आवाजांपर्यंत सर्व काही सुंदर आहे.”

त्यानंतर ती व्यक्ती त्या लहान मुलीला विचारते की, “तुझे नाव तुला आवडते का? त्यावर ती मुलगी हो असे उत्तर देते. त्यानंतर तो तिला विचारतो की, “तू आता भारतात फिरत आहेस तर तुला हा देश आवडला का? त्यावर ती हसते आणि होकारार्थाने मान हलवते.”

नेटकऱ्यांना प्रचंड आवडला व्हिडीओ

भारतीय नेटिझन्स या गोंडस विदेशी मुलीला आणि तिचे सुंदर नाव ऐकून आश्चर्यचकित झाले. व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

एका वापरकर्त्याने म्हटले, “ती इंडिया नावासारखीच गोंडस आणि सुंदर आहे.” दुसर्‍याने कमेंट केली, ‘मग ती नेहमीच मिस इंडिया राहील.’ तिसर्‍या वापरकर्त्याने म्हटले, ‘आज या व्हिडीओने माझे मन जिंकले.’

‘इंडिया’ हे पश्चिमेकडील लोकप्रिय नावांपैकी एक आहे. क्रिस हेम्सवर्थ आणि त्यांची पत्नी एल्सा पाटकी यांनीही त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया रोझ’ ठेवले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.