Viral Video TTE and Passenger Clash Over Seat Issue : भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाते. त्यासाठी टीसी आणि टीटीई नेमून दिलेले असतात. ट्रेन, एक्स्प्रेसमधील एखाद्या प्रवाशाकडे तिकीट नसेल, तर टीटीईने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. ही कारवाई दंड आकारण्यापासून ते प्रवाशाला रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) स्वाधीन करण्यापर्यंत असू शकते. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काहीतरी भयंकर दृश्य पाहायला मिळाले आहे. टीटीई प्रवाशाशी इतका आक्रमकतेने वागतो की, तो त्याला मारहाण करण्यास सुरुवात करतो.

व्हिडीओची सुरुवात टीटीई आणि प्रवाशामधील हाणामारीने होते. टीटीई प्रवाशाची कॉलर खेचून, त्याला ओढताना दिसतो आहे. जेव्हा प्रवासी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा टीटीई त्याच्या केसांना पकडतो. यादरम्यान प्रवासी कदाचित फोनमध्ये हा प्रसंग रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण, टीटीई फोन हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. टीटीईंची अशी आक्रमक वागणूक कधीच दिसून आलेली नाही. त्यामुळे या व्हिडीओवर युजर्स संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अशा प्रकारे भांडण केल्याने कोणताही तोडगा नाही निघणार (Viral Video)

खोटं बोलणारे, सीट सोडणारच नाही, असा हट्ट करणारे, तिकीट नसल्यावर पैसे भरण्यास नकार देणाऱ्या अनेक प्रवाशांना टीसी आणि टीटीईचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकदा त्यांचाही राग अनावर होतो. व्हायरल व्हिडीओतसुद्धा प्रवाशाकडे तिकीट नव्हते. हाणामारीदरम्यान प्रवाशाची सोन्याची चेन तुटली. त्यामुळे तो पैसे भरण्यासाठी, चलान भरण्यासाठी तयार आहे, असे म्हणत या भांडणाच्या व्हिडीओचा शेवट होतो. अनेक प्रवासी यादरम्यान त्यांचे भांडण सोडवण्याचाही प्रयत्न करीत होते.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘टीटीई आणि एका प्रवाशामध्ये सीटवरून भांडण झालं’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. “टीटीईला कोणत्याही परिस्थितीत प्रवाशाशी गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही; त्याने रेल्वे पोलिसांना बोलावावे”, “आजकाल हे सामान्य झाले आहे. अशा समस्या ट्रेनमध्ये दररोज घडतात”, “प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी शांत राहावे. तिकिटे काळजीपूर्वक तपासावीत आणि बसण्याच्या कोणत्याही समस्यांना शांतपणे सोडवावे. अशा प्रकारे भांडण केल्याने कोणताही तोडगा निघणार नाही” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.