Indian woman viral video USA: भारतातून शिक्षण, नोकरी किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात परदेशात गेलेले अनेक तरुण-तरुणी आपलं करिअर घडवण्यात व्यग्र असतात. मात्र, कधी कधी काही जणांकडून झालेल्या छोट्या चुकीमुळे किंवा चुकीच्या कृतीमुळे संपूर्ण भारतीय समाजाची प्रतिमा डागाळली जाते. आजच्या सोशल मीडिया युगात अशा घटना एका क्षणात व्हायरल होतात आणि त्या व्यक्तीबरोबरच ‘भारतीय’ या ओळखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सध्या अमेरिकेत एका भारतीय महिलेने केलेल्या चोरीची घटना आणि तिचा रडत असल्याचा केला गेलेला व्हिडीओ याचं ताजं उदाहरण आहे.
अमेरिकेत एका भारतीय महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला एका दुकानातून कपडे चोरी करताना पकडली गेल्याचं दिसतं. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांबाबत अशा घटना अधूनमधून समोर येतात आणि त्या पाहून अनेक भारतीय नागरिकांना लाज वाटते. मात्र, या घटनेतील विशेष बाब म्हणजे त्या महिलेनं चोरी केलेले कपडे स्वतःसाठी नव्हते, तर आपल्या भावासाठी घेतले असल्याचं सांगितलं आहे.
हा व्हिडीओ अमेरिकेतील एका स्टोअरमध्ये घडलेल्या घटनेचा आहे. त्या ठिकाणी एक भारतीय महिला कपड्यांची खरेदी करीत असल्याचं दिसतं; पण ती घेतलेल्या वस्तूंचे पैसे न भरताच दुकानातून थेट बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना तिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी अडवलं. या घटनेचं चित्रण दुकानातील सुरक्षा कॅमेर्यात आणि मोबाईलवर करण्यात आलं आहे.
व्हिडीओमध्ये त्या महिलेला पोलिसांसमोर अक्षरशः रडू कोसळतं आणि ती वारंवार म्हणते, “सॉरी सर, मी पैसे द्यायचं विसरले.” ती पोलिसांना हात जोडून विनंती करते की, तिला हँडकफ लावू नका; फक्त एक संधी द्या. तिनं सांगितलं की, ती ज्या कपड्यांची चोरी करीत होती, त्यात काही पुरुषांचे कपडे होते आणि ती ते आपल्या भावाला भारतात पाठवणार होती. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या भावाला ‘Made in USA’ प्रॉडक्ट्स खूप आवडतात; पण ते खरेदी करणं त्याला शक्य नाही. पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण अखेरीस तिला अटक करण्यात आली आणि तिला थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओबाबतची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली आहे. काही वापरकर्त्यांनी त्या महिलेसाठी सहानुभूती व्यक्त करीत म्हटलं की, कदाचित ती खरंच विसरली असेल किंवा परिस्थितीमुळे तिला चोरी करावी लागली असेल. तर काहींनी अशा कृतीमुळे देशाचं नाव खराब होत असल्याचं स्पष्टपणे लिहिलं. काहींनी म्हटलं, “अमेरिकेत जाऊन असं वागणं म्हणजे भारताची प्रतिमा मलीन करणं आहे.” तर काहींनी सुचवलं, “अशा छोट्या गोष्टीसाठी आयुष्यभराचं नुकसान करू नये.”
दरम्यान, या महिलेला ‘फेलनी रिटेल थेफ्ट’ या गंभीर गुन्ह्याखाली अटक होण्याची शक्यता असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. या प्रकरणानं पुन्हा एकदा परदेशात भारतीय नागरिकांनी कायद्याचं पालन करण्याबाबतचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
