Viral Video AC Train Passenger Woman Caught Smoking : रेल्वेमुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होतो, त्यामुळेच भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी रेल्वेकडून हजारो गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. पण, यामध्ये काही असे प्रवासीसुद्धा असतात, जे इतरांना त्रास देण्याच्या हेतूने प्रवासात नियमांचे उलंघन करतात. कोणी मोठमोठ्याने गाणी म्हणतो तर कोणी घोरतो; यामुळे इतर प्रवाशांनाही त्याचा त्रास होतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेने बंदी घातली असूनही एसी कोचमध्ये महिला धूम्रपान करताना दिसते आहे. हा व्हिडीओ एका प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला होता; ज्यात तो वारंवार महिलेला एसी कोचमध्ये धूम्रपान करू नकोस. तसेच करायचं असेल तर बाहेर जाऊन कर असेसुद्धा आवर्जून सांगत होता. यावर महिलेचा राग अनावर झाला. एवढेच नाही तर ती त्या अज्ञात पुरुषावर ओरडू लागली. पण, जेव्हा ट्रेनमध्ये तिकीट तपासनीस तिची चौकशी करण्यासाठी आले तेव्हा मात्र महिलेला रडू कोसळले.
इतर प्रवाशांच्या आरोग्याचे काय? (Viral Video)
ट्रेनमध्ये धूम्रपान करण्याबाबतचे नियम आणि कायदे कदाचित माहीत नसलेल्या या महिलेने प्रवाशाला उलट बोलण्यास सुरुवात केली. या भांडणादरम्यान ती ‘मैं तुम्हारे पैसो का नहीं फुक रही हूं’ असे म्हणत व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद करण्याची मागणीदेखील करत होती. जेव्हा प्रकरण टोकाला गेलं तेव्हा गाडीतला तिकीट तपासनीस (टीसी) तेथे आला. टीसी आल्यावर महिला घाबरून रडायला लागली. ट्रेनच्या तिकीट तपासनीसाने धूम्रपान न करण्याचा नियम मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून तीन पर्याय सुचवले. दंड भरायचा, महिलेला कोणताही दंड न करता सोडून दयायचे आणि शेवटच्या पर्यायात प्रकरण पोलिसांकडे सोपवण्याचा सल्ला दिला. पण, पुढे काय घडलं हे कळण्याआधीच व्हिडीओचा शेवट झाला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tusharcrai या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली की, “टीसी हे कोणते पर्याय सांगत आहे? असे पर्याय एखाद्या पुरुषाला दिले असते का? अशा गुन्ह्यासाठी कोणतेही पर्याय नाहीत. सिगारेट ट्रेनमध्ये आग लावू शकते. कठोर शिक्षा देणे हा एकमेव पर्याय आहे. हे रडणं फक्त दंडातून सुटण्यासाठी एक नाटक आहे”, तर दुसरा म्हणतोय की, “सार्वजनिक वाहतूक ही तुमची खाजगी जागा नाही. इतर प्रवाशांच्या आरोग्याचे काय? ही गोष्ट स्त्री-पुरुषाबद्दल नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सार्वजनिक नियमांचा आदर करण्याबद्दल आहे”, तर तिसरा युजर म्हणतोय की, “असं एसी कोचमध्ये बसून कोण सिगारेट पिण्याची हिम्मत करतं? लोकांना धूम्रपान किंवा वासामुळेही समस्या उद्भवू शकते”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.