Himachal Man Rescuing Leopard Cub Viral Video : अनेक जण रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. आपण एखादा व्हिडीओ, फोटो पोस्ट केला तर आपल्यालाही भरपूर लाईक्स आणि व्युव्हज मिळतील असं कुठेतरी मनात येते. अनेकदा प्राणी प्रेमी प्राण्यांना जवळ घेऊन, त्यांचा जीव वाचवून संगोपन करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. कदाचित तसेच काहीसे करायला हा माणूस गेला आणि भलतंच काहीतरी करून बसला. एका माणसाने आईपासून विभक्त झालेल्या बिबट्याच्या पिल्लाला स्वतःच्या गाडीत बसवले.
तर भारतीय वन सेवेच्या (IFS) अधिकाऱ्याने हा व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून शेअर केला. फक्त व्हिडीओच शेअर केला नाही तर हिमाचल प्रदेशातील या रहिवाशाने बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या गाडीतून फिरवल्याबद्दल टीका सुद्धा केली. जरी ही कृती चांगल्या हेतूने केली असली तरीही, प्राण्यांच्या जगण्याच्या शक्यतांना यामुळे हानी पोहोचवू शकते असे त्यांनी आवर्जून म्हंटले आहे.
कोटखाई येथील रहिवासी अंकुश चौहान यांना बिबट्याचे पिल्लू सापडले आणि त्यांनी थिओग येथील विभागीय वन अधिकारी (डीएफओ) यांच्याकडे नेण्याचे ठरवले. यादरम्यान बिबट्या खिडकीतून बाहेर डोकावत कारच्या सीटवर ओरडताना दिसत आहे आणि अंकुश चौहान त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेचा व्हिडीओ काही दिवसांपासून ऑनलाइन व्हायरल झाला आहे.
पोस्ट नक्की बघा…
त्याने वन अधिकाऱ्यांना कळवायला हवे होते… (Viral Video)
दरम्यान, आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आणि म्हटले की, जंगलातील प्राण्यांना वाचवणे हा शेवटचा उपाय असला तरीही वन्य पिल्ले जिथे आढळतील तिथेच सोडली पाहिजेत. जेणेकरून त्यांची आई परत त्यांना घ्यायला येऊ शकेल आणि काहीच सुचत नसेल तर शेवटचा उपाय म्हणून बचाव करा. आम्ही सुद्धा हेच करतो असे परवीन कासवान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवाय, परवीन कासवान यांनी इशारा दिला की, बिबट्याची पिल्ले त्यांच्या आईकडूनच शिकार आणि जगण्याची कौशल्ये शिकत असतात. त्यामुळे आईशिवाय जंगलातील पिल्लाचे संगोपन करणे अत्यंत आव्हानात्मक ठरते. सर्वात वाईट परिस्थितीत म्हणजे अयोग्य पोषणाअभावी एक किंवा दोन महिन्यांत त्या पिल्लाचा मृत्यू होऊ शकतो.
सोशल मीडियावरील वन अधिकाऱ्यांची @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केलेली पोस्ट पाहताच अनेक नेटकरी त्यांच्याशी सहमत झाले आणि लोकांना मार्गदर्शनाशिवाय त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न करण्याऐवजी जंगलातील पिल्ले आढळली तर ताबडतोब वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असा सल्ला दिला. तर अनेक जण “निसर्गाला स्वतःचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी द्यायला हवी. हस्तक्षेप करणे हा शेवटचा उपाय असावा”, “हा खूप वाईट निर्णय आहे. त्याने बिबट्याच्या पिल्लाच्या आईची वाट पाहायला हवी होती. पिल्लाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांना किंवा वन अधिकाऱ्यांना कळवायला हवे होते”, “व्हिडीओ बनवून पोस्ट करण्याच्या नावाखाली हे सर्व केलं आहे” ; आदी अनेक कमेंट्स पोस्टखाली केलेल्या दिसत आहेत.