shocking video: राजधानी भोपाळच्या गजबजलेल्या होशंगाबाद रोड परिसरात सोमवारी संध्याकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच सुरू झालेल्या मॅजिक स्पॉट कॅफेमध्ये तब्बल २० मुखवटाधारी दंगेखोरांनी अवघ्या दोन मिनिटांत तेथील सामानाची नासधूस केली. शस्त्रसदृश दंडुके हातात घेऊन ते कॅफेत घुसले आणि तेथील फर्निचर फोडत त्यांनी गोंधळ घातला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना आपले प्राण वाचवण्यासाठी एकेक करून कॅफेबाहेर पलायन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. व्यावसायिक क्षेत्रात झालेल्या या दंग्यामुळे नागरिक आणि कॅफे व्यवसाय मालकांमध्ये सुरक्षेबाबतची गंभीर चिंता निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा सीसीटीव्ही व्हिडीओ मॅजिक स्पॉट कॅफेमध्ये घडलेल्या अचानक हल्ल्याचा आहे. व्हिडीओत हल्लेखोरांच्या टोळक्याने कॅफेमध्ये प्रवेश करून मालमत्तेचे नुकसान कसे केले हे स्पष्ट दिसते. काही सेकंदांतच कॅफेचे शांत वातावरण भीतीत रूपांतरित होताना दिसते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये २० हून अधिक तरुण दंडुके हातात घेऊन एकाच वेळी कॅफेच्या मुख्य दरवाजातून आत शिरताना दिसतात. आत शिरताच ते खुर्च्या, टेबल्स, काउंटर आणि सजावटीच्या वस्तू यांच्यावर आदळआपट करताना दिसतात. काही जण मोठ्या आवाजात ओरडत आहेत; तर काही सरळ फर्निचरची मोडतोड करण्यावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसते.

या अचानक गोंधळामुळे कॅफेतील ग्राहक घाबरून खुर्च्यांखाली लपतात किंवा धावत बाहेर पडतात. कर्मचारीदेखील आपला जीव वाचवण्यासाठी वाटून कॅफेच्या मागील बाजूस पळतात. संपूर्ण हल्ला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात होतो आणि त्यानंतर सर्व दंगेखोर एकाच वेगाने पळून जातात.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकाने म्हटले, “भोपाळसारख्या मोठ्या शहरात दिवसाढवळ्या असा हल्ला… भीतीदायक आहे.”

दुसऱ्याने म्हटले, ”व्यावसायिकांची सुरक्षा कुठे आहे? यावर तातडीने अॅक्शन घ्या.” तिसऱ्याने म्हटले, “पोलिसांनी आरोपींना ताबडतोब पकडून कडक शिक्षा द्यावी.” काही जण कॅफेच्या ऑपरेटरला पाठिंबा देत म्हणतात, “तुम्ही धैर्य ठेवा, आम्ही सोबत आहोत.” तर काहींनी हा प्रकार स्थानिक गटांमधील वादातून झाला असावा, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

एकूणच, या घटनेने भोपाळमधील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबतची चर्चा पुन्हा एकदा गंभीरपणे सुरू झाली आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे. तपासासाठी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांची संयुक्त टीम काम करीत आहे.