Manali to leh One Wheel Ride: आजच्या डिजिटल जगात व्लॉगिंग आणि सोशल मीडिया हे प्रत्येक तरुणासाठी स्वतःला व्यक्त करण्याचा, वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं सर्वांत प्रभावी माध्यम बनलं आहे. प्रवास असो, खाद्यसंस्कृती असो किंवा फॅशन असो; प्रत्येक गोष्टीचं थेट दर्शन घडविण्यासाठी व्लॉगर विविध संकल्पना अमलात आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करीत असल्याचं दिसतं. मात्र, काही व्लॉगर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर थरारक आणि वेगळेपण जपणाऱ्या संकल्पना मांडून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात.
अशीच एक भन्नाट संकल्पना सध्या चर्चेत आहे. राजस्थानचा लोकप्रिय ट्रॅव्हल व्लॉगर शक्ती सिंह शेखावत यांनी घेतलेला निर्णय हा खरंच धाडसी ठरला आहे. एकपहिया नावाची त्यांची नवी ट्रॅव्हल सीरिज सध्या चर्चेत आहे. कारण- त्यांनी मनाली ते लेह हा प्रवास गाडी किंवा बाईकवरून न करता, एकाच चाकावर चालणाऱ्या अनोख्या बॅलन्सिंग बोर्डवर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे सोशल मीडियावरील त्यांचा हा व्हिडीओ जबरदस्त चर्चेत आला आहे.
या सीरिजचा टीझर शक्ती सिंह यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला होता. त्या टीझरमध्ये त्यांनी जाहीर केले, “मनाली ते लेह हा प्रवास मी चार चाकी किंवा दोन चाकीवरून नाही, तर एकाच चाकावरून करणार आहे.” हे ऐकूनच त्यांचे फॉलोअर्स थक्क झाले. या धाडसी प्रवासाची सुरुवात त्यांनी ३० सप्टेंबरपासून केली आणि ते प्रवासदर्शन ते सोशल मीडियावरून घडवीत आहेत.
पाहा व्हिडिओ
टीझरच्या व्हिडीओमध्ये शक्ती सिंह निसर्गरम्य मार्गावर, हिमालयाच्या सुंदर दृश्यात या एकचाकी बॅलन्सिंग राईडवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यांनी हलक्याफुलक्या शैलीतील आपल्या वडिलांची प्रतिक्रियादेखील सोबत दिली आहे. जेव्हा त्यांच्या वडिलांना समजले की, लेहला तो एकाच चाकावरून जाणार आहे, तेव्हा त्यांना हे वेडेपणाचे आव्हान वाटले. परंतु, नेमकं तेच वेडेपण सिद्ध करण्यासाठी हा प्रवास सुरू असल्याचं शक्ती सिंह सांगतात.
नेटिझन्सनी मात्र या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या भन्नाट कल्पनेचं कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या; तर काहींनी या साहसी कल्पनेवर आव्हानात्मक प्रतिक्रिया दिल्या. एका युजरनं लिहिलं, “तुमच्या पाठीला आणि गुडघ्यांला होणाऱ्या त्राससाठी शुभेच्छा.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “भाऊ, तुला नंतर पश्चात्ताप होणार आहे.” तर आणखी एकानं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे, “भाई, रोड तुटला आहे, जेसीबी घेऊन जा.” एकंदर पाहता, हा व्हिडीओ सोशल मीडियावर साहस, वेडेपणा यांचं उदाहरण आणि चर्चेचा विषय ठरत आहे. शक्ती सिंह शेखावत यांचा हा प्रवास खरोखर पूर्ण होतो का, हे पाहण्यासाठी आता सर्व नेटिझन्स उत्सुक आहेत.