डान्स ही केवळ कला नाही तर ती एक प्रकारची एक्सरसाइजही आहे. डान्स केल्याने शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न होतं आणि आत्मविश्वासही वाढतो. आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक लोक आपल्या टॅलेंटचं प्रदर्शन करतात. पण, काही व्हिडीओ असे असतात जे केवळ टॅलेंट दाखवत नाहीत तर समाजातील ठराविक संकल्पनांनाही आव्हान देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे, ज्यात एका साडीतील महिलेनं असा एनर्जेटिक डान्स केला आहे की पाहणारे थक्क झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ पश्चिम बंगालमधील असल्याचं सांगितलं जातं. व्हिडीओत एक महिला हिरव्या रंगाची साडी नेसून दुर्गा पूजा पंडालच्या बाहेर स्टेजवर धमाल डान्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचं आत्मविश्वासाचं तेज आणि हालचालींमधली ताकद पाहून लोक भारावून गेले आहेत. विशेष म्हणजे या महिलेनं आपल्या शरीराच्या आकाराची पर्वा न करता असा डान्स केला आहे की तिच्या एनर्जी लेव्हलवर लोक विश्वासच ठेवू शकत नाहीत. वजनदार शरीर असूनसुद्धा तिनं केलेल्या डान्समधली चपळाई आणि स्टॅमिना पाहून सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू झाली आहे.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर prasenpiu_ नावाच्या महिला युजरनं पोस्ट केला असून, हा तिच्याच अकाउंटवरचा व्हिडीओ असल्याचं समजतं. व्हिडीओ पोस्ट होताच तो जबरदस्त व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओला जवळपास ३ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले असून, ६.५ लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. लोकांनी तिच्या डान्सचं आणि फिटनेसचं कौतुक केलं आहे. अनेकांनी लिहिलं आहे की, “अशा एनर्जी असलेल्या लोकांमुळेच खरी प्रेरणा मिळते.”

एका युजरनं प्रतिक्रिया देत म्हटले – “गजबची फिटनेस आहे!” तर दुसऱ्यानं मजेशीर अंदाजात लिहिलं – “आंटीने लहानपणी मायकल जॅक्सनलाही हरवलं असतं.” या कमेंट्सवरूनच लोकांचे किती मनोरंजन झाले आहे हे स्पष्ट होतं.

या महिलेनं दाखवलेला डान्स फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यातून एक सकारात्मक संदेशही दिला आहे. शरीराचं वजन कसंही असलं तरी आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर प्रत्येक जण आपल्या कलेतून जग जिंकू शकतो. तिच्या डान्सने समाजातील त्या संकल्पनेला धक्का दिला आहे की “फिटनेस म्हणजे सडपातळ शरीर.” उलट तिच्या हालचाली आणि स्माईलनं दाखवलं की खरी एनर्जी ही मनातून येते, शरीरातून नाही. या व्हिडीओमुळे लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे — “बॉडीवर जाऊ नका, एनर्जी बघा!”