Viral Video: अनेकदा ज्वेलरीच्या दुकानात सोन्याचे दागिने चोरी झाल्याच्या घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आता चोरांची हिंमत जास्त वाढली असून एक नवी युक्ती समोर आली आहे, ज्याने सगळ्यांनाच धक्का बसेल.

दिल्लीच्या लक्ष्मीनगरमधील एका ज्वेलरी दुकानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला फार हुशारीने चोरी करताना दिसतायत. त्या दोघींनी नेमकं काय केलंय ते जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की सोन्याचे दागिने दाखवत असलेली महिला दुकानदार थोड्या वेळासाठी मागे काय वळते, तेवढ्यात त्या दोन महिला ग्राहक त्या संधीचा फायदा घेतात. क्षणातच त्या खरी सोन्याची अंगठी बदलून बनावट अंगठी त्या जागी ठेवतात. सुदैवाने, ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mktyaggi या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.४ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “चोर आणि गुंड यांच्याही कमाल युक्त्या असतात… खरी सोन्याची अंगठी काढून तिच्या जागी बनावट ठेवली, पण सीसीटीव्हीमध्ये सगळं रेकॉर्ड झालं,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्यांना अटक झाली आहे का” तर दुसऱ्याने “अशांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आजकाल चोरांना खरोखरच लाज वाटत नाही, कॅमेरे असले काय आणि गर्दी असली काय त्यांना भीती वाटत नाही.”