महिंद्राची थार ही गाडी आजच्या तरुणांमध्ये एक वेगळीच क्रेझ बनली आहे. तिचा दमदार लूक, ताकद आणि ऑफ-रोडिंगसाठी बनलेली मजबूत बॉडी यामुळे ही गाडी रस्त्यावर उठून दिसते. पण जशी तिची लोकप्रियता वाढली, तशीच थारशी संबंधित दुर्घटना आणि वादही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी रोड रेज आणि अ‍ॅक्सिडेंटच्या घटनांमध्ये थार दिसून आली होती आणि आता पुन्हा एकदा थार चर्चेत आली आहे — यावेळी एका धोकादायक स्टंटमुळे! गॅंग ऑफ थार’ नावाच्या ग्रुपने थार गाडी घेऊन ऑफ-रोडिंग करताना थोडं जास्तच धाडस केलं आणि त्याच धाडसामुळे त्यांची गाडी थेट पाण्यामध्ये बुडाली.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. सांगितलं जातंय की हा व्हिडीओ दिल्लीच्या अरावली हिल्स भागातील आहे. यात थार गाड्यांचा एक ग्रुप ऑफ-रोडिंग करताना दिसतो. पण, मजेत चाललेला हा थरार काही क्षणातच धोकादायक ठरतो. एका थारने पाण्याच्या तळ्याजवळ स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि ती थेट पाण्यात घसरून बुडाली.

व्हिडीओमध्ये एक थार तळ्यातल्या खोल पाण्यात अडकलेली दिसते आणि दुसरी थार ती गाडी बाहेर ओढण्याचा प्रयत्न करताना दिसते. अनेक लोक मिळून गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही गाड्या दोरीने जोडलेल्या आहेत, पण बुडालेली थार हलतही नाही. गाडी बाहेर काढताना इंजिनचा आवाज, पाण्याचे उडणारे शिंतोडे आणि आजूबाजूला जमलेली गर्दी, हे सगळं दृश्य अगदी फिल्मसारखं दिसतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम @statemirrornews अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ

गाडी तळ्यात बुडूनही ड्रायव्हर सुखरूप बाहेर आला. व्हिडीओमध्ये दिसतं की तो थोडा घाबरलेला आहे, पण सुरक्षित आहे. ड्रायव्हर म्हणतो, “मला आनंद आहे की मी ठीक आहे.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच हजारो लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी लिहिलं, “थार असली तरी बुद्धी वापरायला विसरू नका!” तर काहींनी गमतीत म्हटलं, “ही थार आता फिश टँकमध्ये रूपांतरित झाली!” अनेकांनी ड्रायव्हरचं कौतुक केलं की, इतक्या पाण्यातूनही तो कसा बाहेर आला. मात्र, काहींनी या व्हिडीओला धोकादायक कृत्य असल्याचं सांगत टीका केली. “अशी स्टंटबाजी इतरांचे प्राणही धोक्यात आणू शकते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, थ्रिलच्या नावाखाली बेफिकीर ऑफ-रोडिंग केल्याने कधीकधी जीव जाऊ शकतो. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा थार चर्चेत आली आहे – यावेळी त्याच्या शक्तीसाठी नाही तर त्याच्या अपघातासाठी.