Viral Video Of Parenting While Working : प्रसूती रजेनंतर पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या पालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांना कार्यालयामध्ये कामाचा समतोल राखण्याबरोबरच बाळाकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे कामावर रुजू होण्यापूर्वीच बाळाची जबाबदारी कशी घ्यायची, कोणाकडे बाळाला दिवसभर सोपवायचे याबद्दलचे नियोजन त्यांना करावे लागते. पण, आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही तर थक्कच होऊन जाल.

अनेकदा बाळाचा सांभाळ करण्यासाठी जोडपी स्वतःच्या नोकरीचा त्याग करतात; पण, बंगळुरूच्या एका रिक्षाचालकाची कृती पाहून तुमचेही मन भरून येईल. बंगळुरूच्या रिथू नावाची महिलेने प्रवासादरम्यान एक अनोखं दृश्य पहिले. तिच्यासमोर एक रिक्षा पुढे जात होती. त्यामध्ये दोन भूमिका सांभाळणारा खऱ्या आयुष्यातील कलाकार तिला दिसला. म्हणजेच रिक्ष चालक रिक्षा चालवण्याबरोबर छातीशी बांधलेल्या कॅरिअरमध्ये लेकीलाही घेऊन आला होता.

एक माणूस कुटुंब चालवण्यासाठी काय काय करू शकतो? (Viral Video)

बाबा म्हणजे घरातील प्रत्येकाचा आधारस्तंभ असतो; पण लेकीवर त्याचा जरा जास्तच जीव असतो. लेकीसाठी तो आयुष्याच्या प्रत्येक खडतर वाटेवर चालायला तयार असतो. आज या बाबाने लेकीला आईची आठवण येऊ नये म्हणून तो स्वतः आई झाला आहे आणि आपल्या लेकीला घेऊन, तो थेट रिक्षा चालवायला निघाला आहे. त्यातच लेक म्हटल्यावर तिच्यासाठी सुरक्षित वातावरण हवे. म्हणून बाबा आपल्या राजकुमारीला छातीशी कॅरिअर बांधून रिक्षा चालवत आहे. या अनोख्या पित्याची अफाट माया व्हायरल व्हिडीओतून बघा…

व्हिडीओ बघा…

बंगळुरूच्या रिथू नावाच्या महिलेने हा व्हिडीओ तिच्या @rithuuuuuu._ इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केला आहे आणि ‘तो’ कमावण्यासाठी गाडी चालवतो; पण सोबत तेही घेऊन जातो, ज्यासाठी तो खरंच जगतो आहे, अशी सुंदर कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावनिक झाले आहेत आणि “तुम्हाला भरपूर यश मिळो”, “माझे वडीलसुद्धा अशीच रिक्षा चालवायचे. तुमची आठवण येते बाबा”, “एक माणूस त्याचे कुटुंब चालवण्यासाठी काय काय करू शकतो” आदी कमेंट्स, तर काही जणांनी ड्रायव्हरच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले आहे.